छत्रपती संभाजीनगर : जानेवारी महिन्यापासून शहरात ग्वाल्हेरचा औषध कंपनीचा वितरक निशित कुमार सक्सेना (४४) राज्यात नशेसाठी औषधांचा पुरवठा करत होता. बनावट रुग्णालय, डॉक्टरांच्या नावाने कच्चे बिलं तयार करून औषधांवर 'सँपल', 'नॉट फॉर सेल' चे ठसे मारून पुरवठा करत होता, असा धक्कादायक खुलासा स्वत: निशितने गुरुवारी केला.
बुधवारी अटक केलेल्या निशितला पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात आत्तापर्यंत रेशमा अंजुम सय्यद एजाज (४५, रा. किलेअर्क), युसूफ खान महेबूब खान (२८, रा. बायजीपुरा), प्रवीण गवळी (३२, रा. नाशिक) यांना अटक झाली. जानेवारी, २०२४ मध्ये फेडरेक्स कंपनीचा एमआर रवी पांडेच्या माध्यमातून निशित व प्रवीणची ओळख झाली व त्यानंतर प्रवीणच्या सूचनेनुसार हमसफर ट्रॅव्हल्समधून निशित राज्यभरात औषधांचा पुरवठा करत होता. त्याच्या ग्वाल्हेरच्या दुकानातून ३ हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या. औषधांची वाहतूक होणारी हमसफर कंपनीची ट्रॅव्हल्स (एन एल -०१ -बी -२६२३) जप्त करण्यात आली. उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार लालखान पठाण, सतीश जाधव, संदीपान धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, कल्याण निकम, छाया लांडगे, ज्योती भोरे यांनी कारवाई केली.
'नॉट फॉर सेल' नशेखोरांसाठीनिशितकडे मोठ्या प्रमाणात कच्चे बिले आहेत. अस्तित्वातच नसलेल्या रुग्णालयांच्या नावे, डॉक्टरांसाठी दिल्या जाणाऱ्या 'नॉट फॉर सेल' चे ठसे मारून तो औषधांचा पुरवठा करत होता. असे कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले. याच औषधांची नशेखोरांना विक्री होते.
१३ रुपये के लिये 'इमान' बेचाआपण पुरवठा करत असलेल्या औषधांचा महाराष्ट्रात नशेसाठी वापर होत असल्याची निशित कबूल करतो. कधी कच्चे बिले तर कधी डॉक्टरांच्या नावाखाली मी औषधी पाठवली. प्रवीणला दिलेल्या एका बाटलीमागे मला १३ रुपये नफा मिळायचा. पण तो मोठ्या प्रमाणात ऑर्डर देत होता. '१३ रुपये के नफें के लिये मैने 'इमान' बेचा' अशी कबुलीच त्याने पोलिसांसमोर दिली. विशेष म्हणजे निशित बीसीए एमबीए उत्तीर्ण आहे. तरीही औषधांचा व्यवसाय करतो. यासाठी त्याला पांडेने मदत केल्याचेही त्याने सांगितले.