औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो लोक बाधित झाले. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही सातत्याने वाढत चालल्यामुळे शासनाने प्रतिबंधात्मक पाऊले उचलली. त्यामुळे विद्यापीठाला सुरू असलेल्या पदवी परीक्षाही मधूनच स्थगित कराव्या लागल्या, तर दुसरीकडे अजूनही अनेक महाविद्यालयांनी झालेले पेपर तपासून संबंधित विषयांचे गुण विद्यापीठाकडे सादर केलेले नाहीत. त्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आता कोलमडले आहे. १६ मार्चपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पारंपरिक (बीए, बीकॉम, बीएस्सी) पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर ६ एप्रिलपासून अभियांत्रिकी, फार्मसीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या परीक्षा सुरू झाल्या, तर ७ एप्रिलपासून बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाच्या परीक्षाही सुरू झाल्या होत्या. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे महाविद्यालय हेच परीक्षा केंद्र निश्चित केले होते. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे राज्य शासनाने परीक्षा थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरू असलेल्या या परीक्षा १५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आल्या आहेत.
तथापि, विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाचा निकाल एप्रिलअखेरपर्यंत जाहीर करण्याचे सुरुवातीलाच नियोजन केले होते. त्यानुसार विद्यापीठामार्फत त्या त्या महाविद्यालयांना झालेल्या पेपरची ‘अन्सर की’ दुसऱ्या दिवशी पाठवण्यात येत होती. प्राध्यापकांनी पेपर तपासल्यानंतर विषयनिहाय गुण विद्यापीठाच्या पोर्टलवर ऑनलाइन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु अजूनही अनेक महाविद्यालयांनी २० टक्के पेपरचे विषयनिहाय गुण विद्यापीठाकडे पाठविलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संलग्नित महाविद्यालयांना ऑफलाइन पेपरचे मूल्यांकन पाठविण्यासाठी २९ एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
चौकट....
महाविद्यालयांचे निकाल राखीव राहतील
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी गुरुवारी यासंबंधी संबंधित सर्व महाविद्यालयांना एका पत्राद्वारे इशारा दिला आहे की, ८० टक्के पेपरच्या गुणांचा अहवाल विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. उर्वरित २० टक्के पेपरच्या गुणांचा अहवाल महाविद्यालयांनी २९ एप्रिलपर्यंत पाठविला नाही, तर गुणांचा अहवाल ऑनलाइन सादर करण्याबाबतची पोर्टलवरची सुविधा त्यानंतर काढून घेण्यात येईल आणि अशा महाविद्यालयांचे निकाल राखील ठेवण्यात येतील.