औरंगाबाद : विद्यार्थ्यांनो, ३५० रुपये भरा आणि विद्यापीठातून आपले पदवी प्रमाणपत्र घेऊन जा. नाही तर नियमाप्रमाणे दंडाची रक्कम भरल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही. ही संधी विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी ५ जुलैपर्यंतच देण्यात आलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरू आहे. मात्र, अनेक पदवीधरांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्जच केलेले नाहीत. त्यामुळे नोंदणीचा टक्का घसरला आहे. यापूर्वी २० जूनपर्यंतच मतदार नोंदणीची मुदत होती. मात्र, अनेक संघटना तसेच इच्छुकांनी ही बाब कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या निदर्शनास आणून देत मुदतवाढीची मागणी केली. तेव्हा ५ जुलैपर्यंत मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाली आहे.
दीक्षांत समारंभात पदवी न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी १०० रुपये व त्यापुढील प्रति वर्ष ५० रुपये दंड आकारला जातो. कुलगुरूंनी आता विशेष बाब म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये शुल्क व एकत्रित दंड १०० रुपये असे एकूण ३५० रुपये घेऊन पदवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश पदवी विभागाला दिले आहेत.