औरंगाबाद : संपूर्ण शहर साखरझोपेत असताना बुधवारी पहाटे ५.३० वाजता शासकीय रुग्णालयात (घाटी) लिक्विड आॅक्सिजनची पातळी कमी झाली, तर दुसरीकडे आॅक्सिजनचा टँकर येण्यास बिलंब होणार असल्यामुळे तब्बल १६४ रुग्णांचा जीव टांगणीला लागला. आणीबाणीची परिस्थिती ओळखून वरिष्ठ डॉक्टरांपासून परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर जम्बो सिलिंडरद्वारे तब्बल ५ तास रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.चार तासांनंतर आॅक्सिजनचा टँकर आला आणि घाटी प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा आॅक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.सकाळी १० वाजता पहिला आॅक्सिजन टँकर दाखल झाला. त्यानंतर ११ वाजता दुसरा टँकर दाखल झाला. साधारण ११ वाजता लिक्विड आॅक्सिजन टँकची पातळी वाढली आणि सर्वांनी मोकळा श्वास घेतला.मेडिसिन विभागात एमआयसीयू, आयसीसीयूसह ११ वॉर्ड आहेत. यात व्हेंटिलेटरवर ४८, आॅक्सिजन बेडवर (ओटू) ८९ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होते. १२० निगेटिव्ह रुग्णांपैकी वॉर्ड-४ मधील २७ रुग्ण आॅक्सिजन बेडवर दाखल असल्याची माहिती डॉ. हरबडे यांनी दिली.
ऑक्सिजन टँकरच्या बिलंबामुळे १६४ रुग्णांचा जीव टांगणीला, औरंगाबादमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 2:08 AM