रऊफ शेख
फुलंब्री : ग्रामीण भागात कोरोना आजारावर विविध गुणकारी औषधी म्हणून आजही आजीबाईचा बटवा प्रसिद्ध आहे. या बटव्यात पूर्वीपासून पारंपरिक औषधींचा खजिना दडलेला असल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षभरापासून देशात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. ग्रामीण भागात मात्र या रोगापासून आपल्या कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी आजीबाई पारंपरिक पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध वनौषधींचा वापर करीत आहेत. यामुळे याचा अनेक कुटुंबांना फायदाही होत आहे.
ॲलोपॅथी उपचार पद्धती येण्यापूर्वी पूर्वीपासून भारतात पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जात होते. आजही ग्रामीण भागात वृद्ध लोक याच पद्धतीचा वापर करीत असल्याचे दिसते. ताप, खोकला, सर्दी, डोके दुखणे, दात दुखणे आदी दुखण्यांवर आजही ग्रामीण भागात ॲलोपॅथीपेक्षा पारंपरिक उपचार पद्धतींनाच महत्त्व दिले जाते. गूळ, हळद, अद्रक, तुळशीची पाने टाकून करण्यात येणारा काढा तर कोरोना काळात शहरातही लोक मोठ्या प्रमाणात सेवन करीत असल्याचे दिसून आले. याचप्रमाणे गुळवेल या वनस्पतीलाही ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे दिसून आले.
फुलंब्री तालुक्यातील परिस्थिती...
एकूण कोरोना संक्रमित रुग्णसंख्या - १६६४,
एकूण कोरोनामुक्त रुग्णसंख्या - १५१३
एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण - ७४
कोरोनामुळे एकूण मृत्यूसंख्या - ७७
कोट
जुन्या काळात अनेक रोगांवर केवळ आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जात होता. त्यानुसार आजच्या घडीला कोरोनासारखा आजार आलेला आहे. लोकांनी हळद व दुधाचा काढा बनवून सेवन करावा. याने शरीराची अंतर्गत शक्ती वाढते व कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत होईल.
-
- कमलबाई गुलाबराव चव्हाण, किनगाव
कोट
कोरोनासारख्या नवीन आजारावर महत्त्वाचे म्हणजे गुळवेलच्या काढ्याचे नियमित सेवन करावे. याचा फायदा होऊन, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन शरीर रोगमुक्त राहते. सर्दी व तापातही हा काढा रामबाण उपाय आहे.
- विमलबाई संतराम ठोंबरे, पिरबावडा.
कोट
रोगांपासून शरीरास दूर ठेवण्याकरिता अद्रकच्या रसाचे सेवन करणे तसेच चहामध्ये मिरे, तुळशीची पाने टाकून पिणे हे फायदेशीर आहे. पूर्वीपासून याचा वापर केला जातो. यामुळे रोगराई दूर ठेवण्यास मदत होते.
- वेणुबाई नागोराव ढंगारे, फुलंबी
कोट
कोरोनासारख्या आजाराच्या काळात आयुर्वेदिक औषधीला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक नागरिकांनी सकाळी गरम पाण्यात हळद टाकून दिवसभर वारंवार पिल्याने फायदा होतो. तसेच तुळशीची पाने, हळद, काळे मिरे, पुदिना यांचा काढा तयार करून नियमित सेवन करावा. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
- डॉ. अय्याज पटेल, होमिओपॅथी तज्ज्ञ
कशाचा, काय उपयोग
सुंठ (अद्रक)
आजीबाईच्या बटव्यात पूर्वीपासून सुंठ (अद्रक) हा घटक राहिलेला आहे. घसा खवखवायला लागला किंवा खोकला, सर्दीत सुंठ चहात टाकून दिल्यानंतर आराम पडतो. तसेच खोकल्यासाठी मधात सुंठ उगाळून दिल्यानंतरही खूप फायदा होतो.
काळी मिरी, लवंग
आजीबाईच्या बटव्यातील काळी मिरी व लवंग या मसाल्याच्या पदार्थांनाही फार महत्त्व आहे. ताप, खोकल्यासाठी करण्यात येणाऱ्या काढ्यात याचा वापर केला जातो. तसेच दातदुखीसाठी लवंग तोंडात ठेवतात.
गुळवेल
ग्रामीण भागात अनेक आजारांवर गुळवेल प्रभावीपणे वापरतात. ताजा गुळवेल व वाळवून ठेवलेल्या गुळवेलीच्या कांड्या सर्दी, ताप, खोकला, तसेच शरीरात प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत.