---
औरंगाबाद : कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) श्रीकृष्ण वेणीकर यांच्यावर अकार्यक्षमतेचा आरोप करून त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी १६ पैकी १३ सदस्यांनी केली आहे. तक्रारींच्या संदर्भात सीईओंनी कन्नडला भेट देऊन आठवडाभरात करण्यासाठी सांगितलेली प्रलंबित कामेही त्यांनी केली नसल्याने आता त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा उपोषणाला बसतो असा इशारा सर्वपक्षीय सदस्यांनी दिला. त्यासंदर्भात खा. डाॅ. भागवत कराड यांनी सोमवारी भाजप पदाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांची भेट घेतली.
सर्वपक्षीय पंचायत समिती सदस्यांनी कन्नड येथील बीडीओंवर अकार्यक्षमतेचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते म्हणाले, १३८ ग्रामपंचायती, २०२ गावांत मनरेगाची कामे होणे अपेक्षित असताना केवळ २८ ग्रामपंचायतींच्या कामांना आतापर्यंत मंजुरी दिली आहे. विविध विकास योजना, वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या कामांची मंजुरी प्रलंबित आहे. गुरांचे गोठे, विहिरी, पाणंद रस्त्यांची कामे अडली आहेत.
३१ मार्चला सीईओंनी सांगितलेली कामेही त्यांनी केली नाही. त्यामुळे खा. कराड यांच्यासह उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, सभापती अनुराधा चव्हाण, मधुकर वालतुरे, किशोर पवार यांच्यासह पंचायत समिती सदस्यांनी भेट घेऊन कारवाईची मागणी केली. यावेळी सभापती आप्पाराव घुगे, काकासाहेब तायडे, समाधान गायकवाड, सुरेश बोडखे, गीताराम पवार, नंदू ढोले, सुनील निकम, सुरेश चव्हाण आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
---
कन्नड पंचायत समितीच्या १६ पैकी १३ सदस्यांचे गटविकास अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामे खोळंबल्याचे म्हणणे आहे. कामांना गती मिळावी यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह सीईओंची भेट घेतली. त्यांनी आठवडाभरात कारवाईची ग्वाही दिली आहे.
-डाॅ. भागवत कराड, खासदार
---
कन्नड बीडीओंच्या तक्रारीनंतर त्यांना आठवडाभरात एक टास्क पूर्ण करण्यासाठी दिला होता. आठवडा झाल्यावर तेथील पदाधिकाऱ्यांनी बीडीओंनी सांगितलेली कामेही न केल्याचे म्हटले आहे. बीडीओंनी ती कामे केली की नाही याची शहानिशा करून कामे केली नसल्यास कारवाई केली जाईल.
-डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद