योगेश पायघन
औरंगाबाद : देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट'चे ४० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. मात्र, डेल्टा प्लसच्या अनुषंगाने जिल्ह्यात अद्याप कुठलाही संसर्ग किंवा बाधितांची माहिती समोर आलेली नाही. जिल्हा प्रशासन आरोग्य संचालक विभागाशी संपर्कात आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, कोरोना संसर्ग कमी झालेला असला तरी कोरोना गेलेला नाही. हे बायोलाॅजिकल इव्हेंट्स हे ठरावीक फ्रिक्वेन्सीने येत नसतात. केसेस कमी झाल्या म्हणून जी ढिलाई आली ती रोखली पाहिजे. गेले दीड वर्ष आपण जी काळजी घेत होतो, ती पुढील काही महिने पाळावी लागणार आहे. आरएनए विषाणूत रिप्लेक्शन होताना व्हेरिएंट तयार होतात. कोरोनाचाच डेल्टा प्लस व्हेरिएंट असल्याने त्याच्यापासून वाचण्याची काळजी ही कोरोनासारखीच घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सभा, समारंभातून होणारी गर्दी टाळून संसर्गाला उपयुक्त वातावरण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. तर, मला काही होत नाही, अशा आवेशात राहणाऱ्यांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. इतका अकारण आत्मविश्वास न बाळगता कोरोनाच्या या प्रकाराशी लढताना कोरोनाप्रमाणे सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी केले आहे.
--
कोरोनाचे एकूण रुग्ण - १,४५,६६६
बरे झालेले एकूण रुग्ण - १,४१,३७०
उपचार घेत असलेले रुग्ण - ८९२
एकूण मृत्यू - ३,४०४
गृहविलगीकरण - ५२
---
खबरदारी घेण्याच्या सूचना
--
-कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या प्रकाराबद्दल अद्याप निरीक्षणे, संशोधन सुरू असल्याने पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
-कोरोनाचाच हा प्रकार असल्याने कोरोनासाठीच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन सर्वांनीच करण्याची गरज आहे.
- मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करताना लसीकरणावर भर देण्याची गरज असल्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
-कोरोनाच्या गंभीर रुग्णांत विशेष लक्ष देण्याच्या सूचना मेडिसिन विभागाला देण्यात आल्या असून, महिन्याकाठी ठरवून दिलेल्या निकषांनुसार सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.
----
जिल्ह्यात दररोज दोन हजार टेस्टिंग
--
१. जिल्ह्यात शहरात दररोज अँटिजन आणि आरटीपीसीआरच्या माध्यमातून सुमारे दीड हजार नागरिकांची तपासणी केली जात आहे.
२. ग्रामीण भागात सुमारे सातशे ते हजार जणांची तपासणी आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून केली जात आहे.
३. व्हेरिएंटच्या तपासणीसाठी महिन्याकाठी ५० ते १०० स्वॅब सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत असल्याचे घाटीकडून सांगण्यात आले.
----