सोयगाव : खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक खतांचा पुरवठा व्हावा, यासाठी सोयगाव तालुक्याला १५,१५८ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संगीता पवार, कृषी विस्तार अधिकारी अजय गवळी यांनी दिली.
सोयगावला जळगावऐवजी पाचोरा रॅकची जोडणी करण्यात आली. रासायनिक खतांचे आता सोयगावसाठी पाचोराला रॅक लागणार असल्याचे अजय गवळी यांनी सांगितले. शेतीच्या बांधावर खते योजना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा मुबलक पुरवठा व्हावा. याकरिता १५,१५८ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. यात युरिया खताची ६,८५३ मेट्रिक टन अशी सर्वाधिक मागणी करण्यात आली आहे. डीएपी - ९६४, एसएसपी - ९०५, एमओपी - १,०८१, संयुक्त खते ५,३५५ याप्रमाणे मागणी नोंदविण्यात आली आहे.
सोयगावची रॅकची चिंता मिटली
औरंगाबादवरून जळगावला सोयगावसाठी रॅक लागत होते. परंतु, जळगाववरून खते वाहतुकीचा भुर्दंड नाहक शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडत असल्याने शेतकऱ्यांना खते परवडत नव्हती. परंतु, यंदा शासनाने जळगाव, चाळीसगाव आणि पाचोरा रॅकमध्ये सोयगाव तालुक्याला राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.