लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनागोंदी कारभार सुरू असून, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यापीठ बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. आयुक्तांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार श्रीराम बडे यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून, उच्च व तंत्रशिक्षण खात्याला भावना कळविण्याचे आश्वासन दिले.बीसीए व अन्य अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणे, पदवी वाटप करताना आऊट सोर्सिंगसाठी झालेला गैरव्यवहार, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या सीईटीतील गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांची झालेली पिळवणूक, जाहिरातींवरील अनावश्यक खर्च, विद्या परिषद निवडणूक लढविण्यासाठी अपात्र व्यक्तींना परवानगी देऊन विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करणे, कुलगुरूंनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आचारसंहितेचा भंग करणे, विविध अभ्यास मंडळांच्या निवडणूक राजकीय दबावाखाली घेऊन अपात्र व्यक्तींच्या नियुक्या करणे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.या प्रश्नाकडे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीने लक्ष वेधण्यासाठी बुधवारी, १८ जुलै रोजी विद्यापीठ प्रशासकीय इमारतीसमोर दुपारी १२ ते ४ या वेळेत धरणे, शुक्रवारी, २० जुलै रोजी घंटानाद आणि महिनाअखेर महामोर्चा, अशी आंदोलने छेडण्यात येणार असल्याचे प्रा. सुनील मगरे व डॉ. राजाभाऊ करपे यांनी सांगितले.शिष्टमंडळात मुप्टाचे प्रा. सुनील मगरे, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे डॉ. अशोक पवार, बामुक्टोचे प्रा. उमाकांत राठोड, बामुक्टाचे डॉ. विलास खंदारे, एसएफआयचे लोकेश कांबळे, महाराष्ट्र उर्दू संघटनेचे शफियोद्दीन इनामदार, चंद्रकांत चव्हाण आदींसह आठ संघटनांचा शिष्टमंडळात समावेश होता.
अनागोंदी कारभारासंबंधी कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:21 AM