औरंगाबाद : शिक्षक पतसंस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने मागील पाच वर्षांत केलेल्या नियमबाह्य कारभार व गैरव्यवहाराची सखोल चौकशी होऊन दोषी संचालकांवर कारवाईच्या मागणीसाठी संस्थेच्या सभासद व शिक्षकांच्या समन्वय समितीकडून सोमवारी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
समितीने आरोप केला आहे की, संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने मागील पाच वर्षांच्या काळात तत्कालीन चेअरमन यांनी प्राधिकरण सचिव, पुणे यांची मंजुरी न घेता घेतलेल्या बैठकीत बेकायदेशीररित्या सचिव, उपाध्यक्ष यांची निवड करून घेतली. चेअरमन व सचिव यांनी २२ महिन्यांत इमारत दुरुस्तीचे काम उरकून त्यावर कोट्यवधींचा खर्च चुकीच्या पद्धतीने केला आहे. यात अनियमितता झाल्याचे चौकशीतही आढळले आहे. तरीदेखील तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून दोषी संचालक मंडळावर कारवाई होण्यास दिरंगाई होत आहे.
औरंगाबाद तालुका उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी संचालक मंडळाला पाठीशी घालून उलटसुलट चौकशी केल्याचा आरोपही समितीने केला. तर नवनाथ नवथर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणीही समितीने केली आहे. शिक्षक समन्वय समितीचे विजय साळकर, संजीव बोचरे, दिलीप ढाकणे, जयाजी भोसले, बी. के. गाडेकर, कैलास गायकवाड, मनोज चव्हाण, श्रीराम बोचरे आदी उपोषणाला बसले आहेत.
फोटो ओळ : विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषणास सुरुवात केलेले शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी.