वाळूज महानगर : वडगाव मार्गे टाकलेल्या सिडकोच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळ तोडण्यासाठी सिडको प्रशासनाने वाळूज एमआयडीसी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. ही कारवाई ९ जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिडकोतील नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीवर वडगावातील अनेकांनी अनधिकृत नळ घेतले आहेत. त्यामुळे सिडकोतील साईनगरी, बालाजीनगरी, साई प्रतिक्षा, साई प्रसाद, द्वारकानगरी, साराभूमी, साई प्रेरणानगरी, सारा समृद्धी आदी नागरी भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने पाणीचोरी थांबविण्यासाठी अनधिकृत नळजोडणी तोडण्याचा निर्णय घेतला.
यानुसार प्रशासनाने १२ जून रोजी मोहिम राबवून कारवाई करण्याचे निश्चित करुन पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र काही कारणास्तव ही मोहिम बारगळली. प्रशासनाने आता पुन्हा ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेवून यासाठी ९ जुलैचा मुहूर्त निवडला आहे.यासाठी प्रशासनाने नुकतेच वाळूज एमआयडीसी पोलिसांना पत्र देवून बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. पोलीसांनीही बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ९ जुलै रोजी मोहिम राबवून सिडकोच्या जलवाहिनीवरील अनाधिकृत नळ कापण्यात येणार आहेत.