लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील शिवसेनेच्या संस्थापकांतील काही सदस्यांनी एकत्र येऊन ‘संस्थापक शिवसैनिक संघटना’ स्थापन केली असल्याची माहिती संस्थापक जिल्हाप्रमुख व मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच वेळी शिवसेना खा. चंद्रकांत खैरे यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढा तीव्र करणार असल्याचेही सांगितले. यानंतर खैरे यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडेकेली.शिवसेनेचे माजी पदाधिकारी मात्र सध्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा पक्षांमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यात माजी आमदार कैलास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), अविनाश कुमावत (भाजप), सुदाम सोनवणे (काँग्रेस), राजू कुलकर्णी, रमेश सुपेकर, विठ्ठलराव जाधव, विजय पालीवाल, कारभारी जाधव, अॅड. सुहास जोशी आदींचा समावेश होता.सुभाष पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार नवीन संघटनेचा मराठवाड्यात विस्तार केला जाणार आहे. या संघटनेत प्रवेश करण्यासाठी शिवसेनेचे सात आमदार संपर्कात असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. या संघटनेच्या आतापर्यंत सहा बैठका झाल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच खा. खैरे यांनी कन्नड तालुक्यातील आलापूर व देभेगाव गावात खासदार निधीतून केलेल्या २७ लाख रुपयांच्या कामात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिका-यांना निवेदनही देण्यात आले आहे.या निवेदनावर सुभाष पाटील, कैलास पाटील, राजू कुलकर्णी, रमेश सुपेकर, अॅड. सुहास जोशी, सुभाष परदेशी, सदानंद शेळके, कारभारी जाधव, नारायण जाधव, सुदर्शन छोपोले, नंदू गोटे, विजय पालीवाल, दत्ता बिडवे, दिलीप जीवनवाल, चंद्रकांत बिराजदार, शिवाजी अहिर यांच्या स्वाक्ष-या आहेत.
खैरेंवर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:11 AM