लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर शुक्रवारी आरोपांची थेट तोफ डागली.कन्नड मतदारसंघात जी गावेच नाहीत, त्या गावांत खासदार निधीतून कामे केल्याचे दाखविण्यात आले. खा. खैरे यांच्या निधीतून करण्यात आलेल्या त्या कामांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे आ. जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. चौकशीत खैरे दोषी आढळले तर तो अहवाल घेऊन मीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईन, असा वार त्यांनी खा. खैरे यांच्यावर केला. आ. जाधव यांनी आरोपांच्या फैरी झाडत नमूद केले की, कन्नडचे उपविभागीय अधिकारी हरकळकर, तहसीलदार यांंना खा. खैरे यांनी धमकी दिली आहे. खापेश्वर, शिंदेवाडी, मांडवा, झाडेगाव तांडा व आणखी काही गावे कन्नडमध्ये नाहीत. ती गावे इतर कुठे असतील मला माहिती नाही; परंतु कन्नडमध्ये असल्याचे दाखविले आणि गावे नसताना गावांच्या नावावर रक्कम उचलली. ग्रामस्थांनी मला याबाबत विचारणा केली. शिवाय सरपंचांनी त्याची जाहिरात केली. माझ्या मतदारसंघात अशी खोटी कामे होत असतील तर मला बोलावेच लागेल. खासदारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. भ्रष्टाचार ही पक्षशिस्त असेल तर मी गप्प बसेल. खैरेंवर शिवसेनेच्या सरपंचानेच आरोप केलेले आहेत, मी केलेले नाहीत, असेही आ. जाधव म्हणाले. चांडाळचौकडीचा सपोर्ट या सगळ्या प्रकारामागे शिवसेनेतील चांडाळचौकडी आहे. स्वकीयांकडून होणाऱ्या या कारवायांमुळे अस्वस्थ असल्याचे मत खा. खैरे यांनी व्यक्त केले. जे काम विरोधी पक्षांनी करायला हवे होते, ते काम स्वकीयांकडून होत असल्यामुळे नाराज झालेल्या खैरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. आ. जाधव यांनी जे काही आरोप केले आहेत, ते बिनबुडाचे आहेत. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना होण्यापूर्वीची ती गावे असतील, माझ्या विद्यमान मतदारसंघाचा आणि त्या गावांचा संबंध नसल्याचा दावा खा. खैरे यांनी केला. याबाबत मी पक्षप्रमुखांना सांगणार आहे. जाधव यांनी राजीनामा देण्याचे जेव्हा नाटक केले होते, त्यावेळी मी त्यांची मदत केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सांगून राजीनामा नामंजूर करण्यास सांगितले. एकदा पालकमंत्र्यांना उलटसुलट भाषा वापरली. दोघांच्या वादात मी मध्यस्थी केली. या उपकारांची परतफेड अशा पद्धतीने जाधव करीत आहेत, असेही खा. खैरे म्हणाले.
खैरेंकडून खोटी कामे, गुन्हा दाखल करण्याची हर्षवर्धन जाधवांची मागणी
By admin | Published: June 24, 2017 12:26 AM