औरंगाबाद : कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, खाटांची संख्या आणि ऑक्सिजनचा साठा वाढवावा, अशी मागणी औरंगाबाद शहरातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. २२ रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख सहभागी झाले होते.
आ. हरिभाऊ बागडे आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजीव काळे, डॉ. सुंदर कुलकर्णी व डॉ. नीता पाडळकर यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के असून ते समाधानकारक आहे. रूग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधी, खाटा, ऑक्सिजन पुरवठ्यासह पूरक उपचार सुविधा जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात सध्या उपलब्ध असल्याचा दावाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे.
यावेळी बोलताना आ. बागडे म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काेरोना संसर्गाच्या संकटाचा विचार करून गरीब रूग्णांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर अधिक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बाजारपेठा, दुकाने ठराविक वेळात बंद करणे बंधनकारक असले तरी अनेक ठिाकणी या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे यासंबंधीचे नियम अधिक कडक करण्याची गरज असल्याचे आ. जैस्वाल यांनी या बैठकीत सांगितले. तर आयसीयू, व्हेंटिलेटर, खाटांची संख्या, ऑक्सिजन साठा वाढविण्यासोबतच घाटीत विनाखंडित वीजपुरवठा ठेवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.