शेंद्रा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध मांगीरबाबा यात्रेची सुरुवात मंगळवारपासून होणार असल्याने अडचणी निर्माण होऊ नयेत, म्हणून जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना यात्रेसंबंधी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी यात्रा स्थळाची पाहणी केली आहे. प्रशासन जय्यत तयारीला लागले असून, पाणी, आरोग्यसेवेकडे अधिक लक्ष पुरविले जात आहे. राज्यभरातून मांगीरबाबा यात्रेसाठी जवळपास चार लाखांहून अधिक भाविक यात्रा काळात या ठिकाणी दर्शनासाठी येतात. यामुळे या वर्षी यात्रेपूर्वी संबंधित विभागाकडून सेवासुविधा पुरविल्या जात आहेत.मंगळवारपासून यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होणार असली तरी भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. सुरक्षा व आरोग्य यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. यात्रा काळात या ठिकाणी वाहतूक कोंडी न होण्यासाठीही पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. जालना हायवेवर लांबवर वाहनाच्या रांगा लागतात व वाहनधारकांची कोंडी होते. यासाठी पोलिसांकडून व्यवस्था केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व त्यानुसार सुरक्षेबाबत पावले उचलली जात आहेत. दूरवरून आलेले भाविक हे याच परिसरात मुक्कामी थांबतात. यासाठी लाईटची व्यवस्था करण्याचे काम महवितरणकडून प्रगतिपथावर आहे. अनेक ठिकाणी नवीन पोल बसविण्यात आले असून नवीन विद्युत तारा, फ्यूज बॉक्स बसविणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती इ. कामे करण्यात आली.
मांगीरबाबा यात्रेची जय्यत तयारी
By admin | Published: April 24, 2016 11:33 PM