औरंगाबाद : जिल्ह्यात ३ महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांसाठी दररोज जवळपास ४५० रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जात होते. रुग्णसंख्या अधिक असल्याने इंजेक्शन कमी पडत होते. परिणामी, नातेवाइकांना भटकंती करावी लागत होती. मात्र, सध्या रुग्णसंख्या घटल्याने इंजेक्शनच्या मागणीत ७५ टक्के घट झाली. सप्टेंबरच्या तुलनेत सध्या दरराेज जवळपास १०० इंजेक्शन लागत आहेत. जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांवर गेली होती. त्यातही गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक होते. दररोज ४५७ इंजेक्शन तेव्हा वापरले जात होते; परंतु सध्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे इंजेक्शनची मागणीही कमी झाली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोनारुग्ण बचावण्याची शक्यता वाढत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याने जागतिक आरोग्य संघटनेने हे औषध महिनाभरापूर्वी यादीतून वगळले; परंतु आरोग्य विभागाकडून मात्र अद्याप रेमडेसिवीर वापरावर निर्बंध आलेले नाहीत. त्यामुळे शहरात त्याचा वापर सुरूच आहे.
११५ इंजेक्शनची दररोज गरज
औरंगाबादेत सध्या रोज ११५ रेमडेसिवीर इंजेक्शन लागत आहेत. घाटी रुग्णालयात गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. याठिकाणी दररोज २५-३० इंजेक्शनचा वापर होत आहे.
२९४५- घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपा, खाजगी रुग्णालये या सर्व ठिकाणी मिळून सध्या २ हजार ९४५ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत.
अँटिजन टेस्ट, औषधी साठा
मुबलक प्रमाणात उपलब्ध
शहरात महापालिकेकडून अँटिजन टेस्ट केल्या जातात. त्यासाठी महापालिकेकडे आजघडीला ८२५० अँटिजन टेस्ट कीट उपलब्ध असल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारा औषधींचा साठा सध्या घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महापालिकेकडे पुरेसा असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
--
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर कमी झाला आहे. आजघडीला या इंजेक्शनचा साठा पुरेसा आहे. इंजेक्शनची खरेदीही होत आहे; परंतु कमी प्रमाणात खरेदी होत आहे.
-संजय काळे, सहआयुक्त, औषध प्रशासन
कोरोनाचे एकूण रुग्ण-४४,५२२
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण-४२,८५२
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-४९३