बोरगाव बाजार : परिसरात रेशनच्या गहू व तांदळाचा काळाबाजार सुरू असून परिसरात अशा टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांना पोलिसांचेच अभय मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बोरगाव बाजार परिसरातील बोरगाव सारवाणी, म्हसला, टाकळी, कोटनांद्रा, सोनाप्पावाडी, दिडगाव, पिरोळा, सावखेडा, खातखेडा या गावांतून दारिद्र्य रेषेखालील जनतेचे रेशनमधील गहू, तांदूळ धान्याची परराज्यात विक्री केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्याचे देखील गावातील लोकांकडून सांगितले जात आहे.
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वस्त धान्य दुकानात नागरिकांना धान्याचे वाटप केले जाते. कार्डधारकांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे ३५ किलो धान्य महिन्याला वाटप होते. परंतु स्वस्त धान्य दुकानदार तीन रुपये किलोने गहू व चार रुपये किलोने तांदूळ असा दर लावून धान्याची विक्री करतात. किलोमागे एक रुपया अधिकचा आकारून देखील लोक धान्य खरेदी करतात. तेवढ्यावरच न थांबता गहू, तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या गावातील रेशन दुकानातून अधिक किंमत देऊन तेच धान्य परराज्यात विक्री करीत असल्याची चर्चा या परिसरात सुरू झाली आहे. यामध्ये दुचाकी व मोठ्या वाहनांचा वापर केला जात आहे. या धान्याची विक्री करून सर्वसामान्यांच्या तोंडचा घास पळविणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रेशनच्या गहू व तांदळाच्या काळ्याबाजाराला आळा बसावा अशी मागणी केली जात आहे.