वाळूज महानगर : उद्योग वाढीसाठी शासनाने उद्योजकांसाठी पॅकेज प्रोत्साहन योजना सुरु केली. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू दरम्यानच्या काळात पोर्टल बंद असल्याने अनेक उद्योजकांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे हे प्रस्ताव शासनाने आॅफलाईन पद्धतीने घ्यावेत, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.
राज्यातील उद्योग वाढावेत तसेच उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने उद्योजकांसाठी पॅकेज प्रोत्साहन योजना २०१३ (पीएसआय २०१३) ही योजना सुरु केली. या योजनेंतर्गत उद्योजकांना कंपनीतील यंत्र खरेदीसह गुंतवणूकीची माहिती व प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योजक २८ मार्चपासून शासनाच्या पोर्टलवर प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, सदरील पोर्टल बंद दाखवित आहे.
या बाबत संबंधित विभागाशी संपर्क करुन ही बाब लक्षात आणून दिली. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. पोर्टलच्या या तांत्रिक बिघाडामुळे अनेक उद्योजकांचे प्रस्ताव रखडले गेले आहेत. दरम्यान, या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मासिआच्या काही पदाधिकाऱ्याकडून जिल्हा उद्योग केंद्राकडे पत्रव्यवहार सुरु केला आहे. या योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी आॅफलाईन पद्धतीने प्रस्ताव अर्ज घेण्यात यावे, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.