लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्हाळ्याला सुरुवात होताच सातारा-देवळाई परिसरात पाण्याची मागणी वाढली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने व टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी सभोवतालच्या परिसरात नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.सातारा-देवळाई भागाचा महापालिकेत समावेश होऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, अजूनही या भागात महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. उलट प्रशासनाकडून नागरिकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन वाढीव दराने पाणी विक्री केली जात आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने बोअरवेल, हातपंप व विहिरीची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे विविध सोसायटी, कॉलनीत पाण्याची मागणी वाढली आहे. आठवडाभरात पाण्याच्या टँकरसाठी मनपा वॉर्ड कार्यालयात अनेकांनी अर्ज दिले आहेत; पण प्रशासनाकडून पाण्याच्या मागणीची अद्याप पूर्तता केलेली नाही. जलसाठ्याच्या पाणीपातळीत झालेली घट आणि प्रशासनाकडून पाणी देण्यास केली जाणारी टाळाटाळ यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना खाजगी टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे. विकतचे पाणी परवड नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना सभोवतालच्या परिसरातील खाजगी विहिरी, बोअरवेलवरून पायपीट करीत डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.खासगी टँकरला सुगीचे दिवससातारा-देवळाई परिसरात पाणीटंचाईमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. मनपाचे पाणी दर परवडत नसल्याने बहुतांशी नागरिक खाजगी टँकरद्वारे पाणी घेत आहेत. या भागात टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महापालिकेला सर्व ठिकाणी पाणी देणे अशक्य आहे. पाण्याची गरज ओळखून अनेकांनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पाणीटंचाई पाहता खाजगी टँकरला सुगीचे दिवस आले आहेत.
औरंगाबादेत पाण्याची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:20 AM
उन्हाळ्याला सुरुवात होताच सातारा-देवळाई परिसरात पाण्याची मागणी वाढली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने व टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
ठळक मुद्देसातारा-देवळाई : बोअरही आटले; नागरिकांची भटकंती आता सुरू