छत्रपती संभाजीनगर: मैत्रिणीने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाच जणांनी हॉकी स्टीक, लोखंडी पाईप आणि दांड्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या उपचारादरम्यान ७ एप्रिल रोजी रात्री मृत्यू झाला. ही घटना कैलासनगर परिसरातील दादा कॉलनीत २७ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
मुनीर खान करीम खान (४०,रा. कैसर कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख सुलताना हुसेन उर्फ सुलताना मॅडम,शेख जावेद सिराज, सलमान , सोहेल (दोघांची पूर्ण नावे कळू शकली नाही) आणि शेख ताहेर हुसेन (रा. कैलासनगर.दादा कालनी) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेविषयी जिन्सी पोलिसांनी सांगितले की, मृत मुनीर यांच्या ओळखीच्या फैमिदा हमीद शेख(रा. दादा कॉलनी) यांनी आरोपी सुलताना आणि जावेद यांना उसने पैसे दिले होते. फैमिदा या त्यांना उसने पैसे परत मागत होत्या. त्यांनी पैसे दिले नव्हते.
ही बाब समजल्यानंतर मुनीर २७ मार्च रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास फैमिदा यांचे पैसे मागण्यासाठी जावेद आणि सुलताना यांच्याकडे गेला होता. तेव्हा त्यांच्यात झालेल्या वादानंतर आरोपींनी हॉकी स्टीक, लोखंडी पाईप,लाकडी दांड्याने मुनीर यांच्या पोटावर , छातीवर पाठीवर आणि गुप्तांगाला जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. या घटनेनंतर सय्यद मिनार यांनी त्यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले होते. घटनेपासून ते बेशुद्धच होते, यामुळे त्यांचा जबाब पोलिसांना नेांदविता आला नाही.
या घटनेप्रकरणी मुनीर यांची पत्नी यास्मिन बेगम मुनीर खान यांनी ५ एप्रिल रोजी आरोपींविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात खूनाचा प्रयत्न करणे, दंगा केल्याचा गुन्हा नोंदविला होता. घटनेचा तपास सुरू असताना ७ एप्रिल रोजी रात्री मुनीर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बाब समजल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात खूनाचे कलम लावले. याबाबतचा अहवाल न्यायालयास सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले.तपास पोलीस उपनिरीक्षक काकड करीत आहेत.
आरोपींचा शोध सुरू२७ मार्च रोजी झालेल्या या घटनेपासून आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले.