औरंगाबाद : पोटच्या मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून पाच वर्षांपासून विनयभंग करून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ४७ वर्षीय नराधम बापाला सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी १८ महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड ठोठावला.
याबाबत २० वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती की, ती उच्चशिक्षित आहे. घटनेच्या सुमारे पाच वर्षांपूर्वी ती १६ वर्षांची असताना बाप तिला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग करत होता. ही बाब मुलीने आईला वेळोवेळी सांगितली. मात्र, आई विश्वास ठेवत नव्हती. मुलगी दहावीत असताना बापाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यावेळी मुलीच्या आईने व तिने त्याला समजावून सांगितले. काही दिवस शांत राहून त्याने पुन्हा अश्लील चाळे सुरू केले. अखेर कंटाळून ३ मे २०२१ रोजी मुलीने बापाविरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली.
६ मे २०२१ रोजी दुपारी त्याने मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्याने तिची आई तेथे आली. याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन उपनिरीक्षक निरीक्षक प्रीती फड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून जमादार शेख रज्जाक यांनी काम पाहिले.