औरंगाबाद : 'आम्ही ब्राह्मण वाजवतो पळी ताम्हण, आमचं मागणं मांडतो शांततेनं...' असे म्हणत आणि ताम्हण- पळीचा आवाज करत ब्राह्मण समाजाने आपल्या मागण्या पुन्हा एकदा शासन दरबारी मांडल्या. ब्राह्मण समाज संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्तालयासमोर करण्यात आलेले ताम्हण-पळी बजाओ आंदोलन लक्षवेधी ठरले.
जय परशूराम असे लिहिलेल्या केशरी रंगाच्या टोप्या, पिवळ्या आणि केशरी रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या महिला आणि कद किंवा धोतर अशी ब्राह्मणांची पारंपरिक वेशभुषा करून आलेले पुरूष हे या आंदोलनाचे वेगळेपण ठरले. ताम्हण आणि पळी ही खास ब्राह्मण समाजाची प्रतिके म्हणून ओळखली जातात. त्यामुळे आंदोलन करण्यासाठी या दोन प्रतिकांची निवड करण्यात आली होती. ब्राह्मण समाजाच्या माफक आणि न्याय मागण्यांसाठी समाजाच्यावतीने अनेक वर्षांपासून लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. परंतू याकडे शासन सर्रास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता तरी शासनाने जागे होऊन समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली होती.
१ जानेवारीपासून अशा प्रकारचे आंदोलन मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आले असून मराठवाड्यातील आंदोलनाचा समारोप शुक्रवारी औरंगाबाद येथे झाला. अशाच प्रकारचे आंदोलन आता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथेही करण्यात येणार आहे. आता जर शासनाने मागण्यांसंदर्भात ठोस भूमिका घेतली नाही, तर यानंतरचे आंदोलन अधिक तिव्र असेल, असा इशाराही समितीने दिला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, विजया रहाटकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. समितीचे समन्वयक दिपक रणनवरे, प्रमोद पुसरेकर, धनंजय कुलकर्णी, विजया अवस्थी, संगीता शर्मा, विजया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले. आदिशक्ती भजनी मंडळाच्या महिलांनी केलेले भारूड लक्षवेधी ठरले.
या मागण्यांसाठी आंदोलन :- समाजाचे आर्थिक सर्व्हेक्षण व्हावे.- तरूणांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास १ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी.- प्रत्येक जिल्ह्यात मुला- मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करावे.- केजी टू पीजी शिक्षण मोफत करावे.- ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अथवा तत्सम कायदा करून कारवाई व्हावी.- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.- पुरोहित समाजाला मासिक ५ हजार रूपये मानधन द्यावे.- ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्या.