औरंगाबाद - भाजपा-शिवसेना युतीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी युतीचा धर्म पाळला नाही. दानवेंनी जावई प्रेमापोटी जावईधर्म पाळल्याची तक्रार चंद्रकांत खैरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. दानवेंचे जावई आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवार बनून लोकसभा निवडणूक लढवली.
खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या 15 वर्षांपासून औरंबादचे खासदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, यंदा चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत तगडे आव्हान मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार इम्तियाज जलील यांनी खैरेंना टक्कर दिली. तर, काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचेही आव्हान खैरेंना होते. त्यातच, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनीही अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे महायुतीच्या प्रचारात दानवेंचा सक्रीय सहभाग दिसला नाही. याउलट दानवेंनी आपल्या जावयालाच मदत केल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला आहे.
जावयावरील प्रेमापोटी दानवे यांनी शिव स्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात युतीचा धर्म पाळला नसल्याची तक्रार खैरे यांनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. या प्रकारामुळे भाजप-शिवसेना युतीमध्ये निवडणुकी दरम्यानच तणाव निर्माण झाला होता. तरीही आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा आत्मविश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेही तक्रार दिली आहे.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या भाषणांमध्येही जाहीरपणे दानवेंचे नाव घेऊन सासरा जावयालाच मदत करणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या खास शैलीत हर्षवर्धन हे निवडणूक प्रचारासाठी स्वतंत्र सभा घेत होते. त्यावेळी, आमचे सासरेबुवा रावसाहेब दानवे घरी आल्याचा किस्सा ते प्रत्येक सभेत आवर्जून सांगत. त्यामुळे दानवेंनी अप्रत्यक्षपणे जावयाला मदत केल्याची चर्चा औरंगाबाद जिल्ह्यातही रंगली आहे.