चितेगाव : पैठणखेडा (ता. पैठण) येथील अर्ध्या गावाला महसूल विभागाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचे कारण सांगून ३० दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे गावातील सुमारे दोनशे कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांची या लोकांनी भेट घेऊन निवेदन दिले.
गावातील सुमारे दोनशे कुटुंब १९६२ पासून गायरान जमिनीवर राहत आहेत. यातील बहुतांश कुटुंबांना शासनाने विविध शासकीय योजनेंतर्गत गायरान जमीन गट क्र. ११ व १२ मध्ये जागा दिली होती. मात्र, पूर्वीचे अशिक्षित लोकं असल्यामुळे त्यांनी जागा दिल्याचा ना पुरावा मागितला ना तहसील कार्यालयाने त्यांना दिला. मात्र, या ग्रामस्थांची नोंद ग्रामपंचायतमध्ये आठ ‘अ’मध्ये घेण्यात आली आहे. याच गटामध्ये जि. प. शाळा, अंगणवाडी, ग्रा. पं. कार्यालय, आहे. तसेच ग्रामपंचायतने येथे नळ, पाणी सारख्या सुविधाही पुरविल्या आहेत. असे असताना महसूल प्रशासनाने दिलेल्या नोटिसीवरून ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
शासनाने नोंद घ्यावी शासनाने या नागरिकांना जागा दिली; पण साताबार उताऱ्यावर आज ही गट क्र. ११ व १२ वर सरकारचे नाव आहे. या नागरिकांना विविध शासकीय योजनेंतर्गत दिलेल्या जागेचे क्षेत्र सदरील सातबाऱ्यातून कमी केलेले नाही. त्यामुळे सातबाऱ्यावर आजही गायरान क्षेत्र दिसत आहे. शासनाने चौकशी करून येथे राहत असलेल्या ग्रामस्थांच्या नावावर मालकी हक्काची नोंद घ्यावी.- सज्जन भुजंग, उपसरपंच, पैठणखेडा