औरंगाबाद : मालमत्तांना कर लावण्यास जे विरोध करीत असतील त्यांच्या मालमत्ता सील करा, अन्यथा जेसीबी लावा, असा धमकीवजा आदेश आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिला. ३१ डिसेंबरपर्यंत सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
गेल्या तीन दिवसांपासून आयुक्तांनी शहरातील विविध वॉर्डांची पाहणी सुरू केली. गुरुवारी सकाळी रोशनगेट येथून पाहणीला प्रारंभ केला. या पाहणीत वॉर्ड अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेचे बिंगही फुटले. निष्क्रिय कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. रोशनगेट, चंपाचौक, दमडी महल, शहाबाजार येथून कटकटगेटपर्यंत पाहणी करून नेहरूनगर प्राथमिक आरोग्य केंद्र्राला आयुक्तांनी भेट दिली. पाहणीअंती आयुक्तांनी ज्या-ज्या ठिकाणी आदेश दिले, कोणत्या अधिकाऱ्यांना दिले, त्याची पूर्ण टिप्पणी सादर करा, असे आदेश स्वीय सहायकांना दिले.
पाहणी करताना रस्त्यावरील अतिक्रमणे, मालमत्ताकर नसलेली दुकाने, बहुमजली इमारतींवरून आयुक्तांनी अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. रोशनगेटमध्ये नान बनविणाऱ्या एका कारागिराकडून ते कसे बनवितात याची माहिती घेऊन खाद्यप्रेमी असल्याचेही दाखवून दिले. तसेच ऐतिहासिक दरवाजांसाठी हेरिटेज सफारी सुरू करण्यास रस्त्यापासून दहा फूट लांबपर्यंत मालमत्ता असाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
मनपाकडून महसुलात वाढ करण्यासाठी झोननिहाय मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येते. मात्र शहाबाजारमध्ये काही मालमत्ताधारक विरोध करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी आयुक्तांना सांगितले. ज्यांच्याकडून विरोध होत असेल त्यांच्या मालमत्तांना जेसीबी लावा. त्यानंतरही ऐकले नाही, तर थेट कारवाईचे आदेश मीच देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोशनगेट परिसरात जे. के. नावाच्या बहुमजली इमारतीस कर लागला नसल्याचे पाहणीत समोर आले. इमारत मालकांकडून व्यावसायिक कर वसूल करा, भरण्यास विरोध केल्यास मालमत्तांना सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच रस्त्यातील डी.पी.पैसे भरूनही महावितरण काढत नसल्यामुळे येत्या मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी नोटीस काढण्याच्या सूचना शहर अभियंता एस.डी.पानझडे यांना आयुक्तांनी केल्या.
व्यावसायिक मालमत्ता, इमारतींवर नजरआयुक्तांनी पाहणी करताना रोशनगेट ते चंपाचौक या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या बड्या इमारतींच्या करसंकलनाची माहिती घेतली. त्यावेळी जे. के. व्यापारी संकुलास कर लागला नसल्याचे समोर आले. त्याचा कर दोन दिवसांत वसूल करा, कर न दिल्यास इमारत सील करा. तसेच फ्रेश बेकच्या इमारतीला कर लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. रोशनगेटमधील पूर्ण अनधिकृ त बांधकाम पाडण्याचे आदेश आयुक्तांनी अतिक्रमण विभागप्रमुख रवींद्र निकम यांना दिले. तसेच एका बहुमजली इमारतीच्या अर्ध्या बांधकामालाच परवानगी असल्याचे समोर येताच मालकाला नोटीस देऊन वरच्या मजल्यापासून पाडण्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. चंपाचौक ते दमडी महलपर्यंतच्या दोन्ही बाजूच्या दुकानांना, औरंगाबाद दूध डेअरीला व्यावसायिक कर लावण्याचे आदेश देऊन विरोध झाल्यास पाडापाडीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
३१ डिसेंबरपर्यंत सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करा पाहणीत अनेक मालमत्तांना कर लावला नसल्याचे समोर आले. झोन क्र. ३ सह पूर्ण शहरातील मालमत्तांना कर लावण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यासाठी मनुष्यबळ वाढवून देण्याचा शब्दही त्यांनी दिला. नोटीस देणारा, सर्वेक्षण करणाऱ्यांनीच पाणीपट्टीची माहिती घेऊन करवसुली करावी, असे आयुक्त म्हणाले, तसेच वॉर्ड झोनमधील सी.एस. अभंग आणि शहापूरकर यांच्या कामावर आयुक्तांनी नाराज व्यक्त केली. इमारतींना तीन महिन्यांपासून कर आकारणी होत नसल्या कारणाने शहापूरकर यांना नोटीस बजावण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.