बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारा बलुतेदार महासंघ बीड शाखेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजी करत शासनाचा निषेध कार्यकर्त्यांनी केला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात महासंघाने म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाली, तरीही बारा बलुतेदार, ११ आलुतेदार समाज हा विकासापासून वंचित आहे. गावगाडा चालविणारा, गावाला आकार देणारा समाज गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्टया मागासलेला आहे. या समाजाची उन्नती व्हावी, यासाठी कोणताही महत्वाकांक्षी निर्णय सरकारने यापूर्वी घेतलेला नाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे नेत्यांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा समाज आजही मुख्य प्रवाहाच्या बाहेरच आहे.अनेक बेरोजगार तरूण कामाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना आर्थिक योजना नसल्याने तुटपूंज्या रोजगारावरच आयुष्य जगावे लागत आहे. सरकारला जागे करण्यासाठी व्यापक आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या केल्या. बारा बलुतेदार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तयार करावे, समाजातील निवृत्त कारागिरांना दोन हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, बारा बलुतेदार समाजातील संतांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह बांधावे, तसेच लोकसभा, विधानसभा मतदारसंघामध्ये या समाजातील आरक्षित मतदारसंघ व राज्यसभा, विधानपरिषद सभागृहाचे सदस्यत्व देण्यात यावे. यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या. या आंदोलनात बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर, अॅड. संदीप बेदरे, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे, अर्जुन दळे, कुलदीप जाधव, मोहन जाधव, गणेश शिंदे, दत्ता नलावडे, गणेश जगताप, रमाकांत पतंगे, द्वारकादास फटाले, रामचंद्र बेदरकर, उमेश राजगुरू, राजू ताटे, गुलाब चव्हाण, दिनेश टाकणखार, रामेश्वर वाघमारे, दत्ता जाधव, दत्ता व्यवहारे आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बारा बलुतेदार समाजाची निदर्शने
By admin | Published: August 27, 2014 1:28 AM