औरंगाबाद : ‘दशक्रिया’ या चित्रपटात ब्राह्मण समाजाविषयी अवमानकारक चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप करीत, ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने १६ रोजी सकाळी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
‘ दशक्रिया चित्रपट प्रदर्शित करणा-या निर्माता व दिग्दर्शकाचा निषेध असो’, ‘ चित्रपटाला परवानगी देणा-या सेन्सॉर बोर्डाचा धिक्कार असो’, ‘ हिंदु संस्कृती टिकलीच पाहिजे, संस्कृतीचे रक्षण केलेच पाहिजे,’ ‘ कायदा आहे सर्वांसाठी, कारवाई व्हावी समाजभेद करणा-यासाठी’ अशा घोषणा देत ब्राह्मण समाजाने निदर्शने केली. क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली सकाळी ११ वाजता निदर्शनाला सुरुवात झाली. या निदर्शनात समाजातील तरुण व ज्येष्ठ मंडळी तसेच तरुणी व महिलाही हिरारीने सहभागी झाल्या होत्या.
समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर यांनी सांगितले की, दशक्रिया चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामीकारक दृश्य व संवाद दाखविण्यात आले आहेत. ‘दशक्रिया विधी हा संस्कार ब्राह्मण समाज आणि पुरोहित यांनी आपल्या उदरर्निवाहाचे साधन म्हणून सुरु केला आहे.’ अशा प्रकारचे अनेक अवमानकारक वाक्य व दृश्य चित्रपटात आहे. देशात सर्वांना मत स्वातंत्र्य आहे पण कोणत्याही समाजाचा अवमानकरण्याचा अधिकार कोणालाही नाही. याचे भान निर्माता, दिग्दर्शकांनी ठेवणे आवश्यक आहे. कोणताही धर्म, समाज असो, त्याचा अवमान करणारा चित्रपट काढणा-यास संन्सॉर बोर्ड परवानगी देते कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी विजया कुलकर्णी, अंजली गोरे, वनिता पत्की, गीता आचार्य, यांच्यासह सुरेश देशपांडे, अनिल खंडाळकर, आनंद तांदुळवाडीकर, मिलींद दामोदरे,धनंजय पांडे, मंगेश पळसकर, संजय पांडे, मनोज पिंपळे, डॉ. संतोष सवई, प्रथमेश कुलकर्णी, सुधीर नाईक यांच्यासह समाजबांधव हजर होते. सायंकाळी बहुभाषिक ब्राह्मण संघटनेच्या वतीने गुलमंडीवर निदर्शने करण्यात आली. यात शहरातील पुरोहित सहभागी झाले होते.
सिनेमागृहांना निवेदन दशक्रिया हा चित्रपट सिनेमागृहात दाखवू नये, असे निवेदन ब्राह्मण समाजाच्या वतीने सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांना देण्यात आले. निवेदन देणा-या शिष्टमंडळात आशिष सुरडकर, सतीश खनाळे, पंकज पाठक, अभिषेक कादी, प्रवीण सराफ, श्रीनिवास देव, भूषण एकबोटे, अभिजित कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिका-यांचा समावेश होता.