लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : १ जुलैपासून वाढीव ७ टक्के महागाई भत्ता द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी २० जुलै रोजी गंगाखेड रोडवरील विभागीय कार्यशाळेसमोर एस.टी.कामगार संघटनेने निदर्शने करून आंदोलन केले. एस.टी. महामंडळातील कामगार या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.एस.टी.कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वेळोवेळी आंदोलने करुनही प्रश्न निकाली निघत नसल्याने गुरुवारी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी २ वाजेच्या सुमारास गंगाखेड रोडवरील महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. १ एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतिरिम वाढ द्यावी, वेतन करारातील कलम १४७ चा भंग करुन वेळापत्रक अंमलबजावणी संदर्भात एकतर्फी प्रसारित केलेले परिपत्रक रद्द करावे, तीन- चार वर्षापासूनचे गणवेशाचे कापड कर्मचाऱ्यांना मिळाले नाही, ते द्यावे, चालक कम वाहक पदाची संकल्पना रद्द करुन नियमानुसार कामगारांच्या नियुक्त्या कराव्यात, सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार कार्यमुक्त करावे, आदी ११ मागण्या यावेळी करण्यात आल्या. एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मनोहरराव गावंडे व विभागीय सचिव गोविंदराव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राम तिडके, जावेद अन्सारी, व्यंकट कदम, कन्नावार, जाईलवार, वैजनाथ बडे, तळेकर, प्रमोद बीडकर, सोपान बनसोडे, प्रकाश निकम, संदीप प्रधान, माधव कांबळे, गौतम कांबळे, मदन भालेराव, डी.डी.दराडे, श्रीनिवास देशमुख, दिनकर भोपाळे, सुरेश कदम, तानाजी बेंगाळ, अकबर खान पठाण, माणिक देशमुख यांच्यासह सातही आगारामधील कामगार सहभागी झाले होते.
एस.टी.कामगार संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:26 AM