वाळूज महानगर : वाळूज महानगर औद्योगिक क्षेत्रात डेंग्यू, चिकुन गुनिया, कावीळ, मलेरिया आदी साथरोगांनी थैमान घातले आहे. आज पंढरपुरात डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे.मागील आठवड्यात बजाजनगरातील विठ्ठल रमेश मगरे व अश्लेषा शहाणे या दोघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. यामुळे वाळूज महानगरात खळबळ उडाली असून, पंढरपूर येथील सोनार गल्लीतील रहिवासी शिवाजी तोडकर यांची मुलगी रेणुका (६) हिच्या अंगाला अचानक खाज येऊन हात-पाय दुखणे व लालसर झाल्याने तिला नातेवाईकांनी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले असून, रेणुकाला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पंढरपुरातील सलामपुरेनगर, सोनार गल्ली, इंदिरानगर, फुलेनगर, पोलीस कॉलनी, दीपनगर, गिरीराज हौसिंग सोसायटी आदी भागांत सांडपाण्याची डबकी साचली आहेत. प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छता व धूरफवारणी करण्यात येत नसल्याने या भागात दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पंढरपुरात आढळला डेंग्यूचा रुग्ण
By admin | Published: August 03, 2014 12:51 AM