औरंगाबाद : राज्य सरकारने विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक्स हजेरी अनिवार्य केली आहे. शिक्षण विभागाने वारंवार सूचना देत बायोमेट्रिक्स यंत्रणा बसवून अहवाल सादर करण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत. औरंगाबाद विभागातील १ हजार ४९ महाविद्यालयांपैकी अवघ्या १८८ महाविद्यालयांनीच बायोमेट्रिक्स यंत्रणा बसवली. यामुळे आता शिक्षण विभागाने यासाठी जिल्हानिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने वाढत्या खासगी शिकवणींचे प्रस्थ कमी करण्यासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक्स हजेरी बंधनकारक केली आहे. एकदा अकरावीला प्रवेश घेतला की, विद्यार्थी थेट बारावीच्या परीक्षेलाच दिसतात. आतापर्यंत हीच स्थिती प्रत्येक महाविद्यालयात पाहावयास मिळाली आहे. अगदी विज्ञान शाखेचे विद्यार्थीदेखील महाविद्यालयात नियमित येत नाहीत, तर विद्यार्थी टिकावेत, म्हणून महाविद्यालयांनीदेखील शिकवणी वर्गांसोबत करार करीत प्रात्यक्षिकासही उपस्थित न राहण्यास विद्यार्थ्यांना मुभा दिली.
या प्रकारांना आळा बसावा, सर्व विद्यार्थी नियमित महाविद्यालयात यावेत यासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक्सपद्धतीने नोंदवावी, असा शासन निर्णयच शिक्षण विभागाने काढला. सुरुवातीला ३० जुलै आणि त्यानंतर आॅगस्ट अखेरपर्यंत महाविद्यालयांना बायोमेट्रिक्स मशीन बसवून हजेरी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. औरंगाबाद विभागात एकूण १,०४९ महाविद्यालये आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १८८ महाविद्यालयांनीच बायोमेट्रिक्सची माहिती शिक्षण विभागाला कळविल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आता जिल्हानिहाय महाविद्यालयांचा बैठका घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.