छत्रपती संभाजीनगर : आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ खाणे, यालाच आखाड तळणे असे म्हणतात. या काळात तिखट पुरी, गोड पुरी, शंकरपाळे घरोघरी केले जातात. त्याचा नैवेद्य देवीला दाखविला जातो. त्यानंतर घरातील सर्व जण हे तेलकट पदार्थ चवीने खातात. तळण्यासाठी करडी तेलाचा जास्त वापर केला जातो. यामुळे सध्या बाजारात करडी तेलाची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे. अन्य खाद्यतेलापेक्षा महाग असले तरी करडी तेल आर्वजून खरेदी केले जात आहे.
खाद्यतेलाचे भावतेलाचा प्रकार किंमत (प्रति लीटर पॅकिंग)१) करडी तेल---- १८० रु२) शेंगदाणा तेल---- १७५ रु३) सूर्यफूल तेल---- १०८ रु४) सोयाबीन तेल---१०२ रु५) सरकी तेल---१०२ रु६) पामतेल---९८ रु
का वाढली करडी तेलाची विक्री?आषाढात विविध पदार्थ तळले जातात. शेंगदाणा तेलाचा वापर केला तर धूर निघतो, यासाठी करडी तेलाचा वापर केला जातो. इतर महिन्यांत सोयाबीन, सूर्यफूल तेलाचा वापर होत असला तरी पदार्थ चवदार बनण्यासाठी करडीचे शुद्ध तेल खरेदीकडे सर्वांचा कल असतो.
का खाल्ले जातात तेलकट पदार्थ?आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. कारण, या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते. शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच तेलकट व गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करतात. तसेच आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते. पण जास्त तेलकट पदार्थ खाणेही टाळले पाहिजे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला.
आफ्रिकेतून येणार सोयाबीन तेलयंदा देशात व विदेशात सोयाबीनचे उत्पादन समाधानकारक आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात आफ्रिकेतून सोयाबीन तेलाची आयात होईल. मागील दीड महिन्यापासून खाद्यतेलाचे भाव स्थिर असून पुढेही भाववाढीची शक्यता कमी आहे.- प्रशांत खटोड, व्यापारी