पैठण ( औरंगाबाद ) : दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सहा जणांना औरंगाबाद जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पैठण पोलिसांनी हद्दपार प्राधिकरणाकडे या बाबतचा प्रस्ताव दाखल केला होता. प्राधिकरणाने या बाबत सुनावणी घेऊन सहा जणांना हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
औरंगाबाद-पैठण रस्त्यावर रोडरॉबरी करण्यात हातखंडा असलेल्या या सहा जणांची गँग पल्सर नावाने कुख्यात होती. पैठण शहर व तालुक्यात उच्छाद मांडलेल्या सहा जणांना पैठण पोलिसांनी वर्षभरापूर्वी अटक केल्यानंतर परिसरातील लुटमारीच्या घटना थांबल्या आहेत. पैठण शहरातील नारळा येथील नितीन गुलाब घटे, अंरविद रोहीदास गायकवाड, विकास कैलास गुडे यासह वरुडी ता पैठण येथील नामदेव ज्ञानेश्वर बेदरे, सिध्दार्थ उत्तम सदावर्ते, कृष्णा धोंडीराम गोर्डे या सहा जणांना औरंगाबाद जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.
या दरोडेखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना हद्दपार करण्यासाठी पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालया मार्फत हद्दपार प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केला होता. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया अप्पर पोलिस अधीक्षक पवन बनसोड ,उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दरोडेखोरांना हद्दपार करण्यासाठी प्राधिकरणाकडे सक्षम बाजू मांडली.
२० जानेवारी,२०२१ रोजी पैठण-औरंगाबाद रोडवर महानंद दूध केंद्राजवळ रात्रीच्या सुमारास या सहा जणांनी ट्रक्टर चालकास मारहाणकरून त्याचे हातपाय बांधून ऊसाचे टँक्टर, दोन ट्राँलीसह पळवून नेले होते. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैठण पोलिसांनी केलेल्या तपासात या सहा जणांना अटक करण्यात आली होती. या नंतर त्यांनी केलेले विविध गुन्हे उघडकीस आले होते.