औरंगाबाद : विद्यापीठाने अकॅडमिक ऑडिटसाठी मागविलेल्या प्रस्तावाला संलग्न महाविद्यालयांनी मुदतवाढ देऊनही प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत अवघ्या ३४ महाविद्यालयांनी पूर्ण प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपण्यास काही तास उरले असताना ११९ महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल केले. तर ३५० महाविद्यालयांनी लॉगिन आयडी तयार केले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना संलग्नता देण्यासाठी अकॅडमिक आॅडिट बंधनकारक केले आहे. यासाठी १६ जानेवारी रोजी प्रस्ताव मागविले होते. ३१ जानेवारीपर्यंत मुदत असताना केवळ ३४ महाविद्यालयांनीच प्रस्ताव दाखल केले होते. काही संस्थाचालकांच्या मागणीनुसार विद्यापीठ प्रशासनाने प्रस्ताव दाखल करण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.
दीक्षांत सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अकॅडमिक आॅडिटसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, महाविद्यालयांना आॅडिटसाठी प्रस्ताव दाखल करण्यास १० फेब्रुवारीची मुदत दिली होती. मात्र दुपारपर्यंत ११९ महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. आॅडिट झालेल्या ६१ महाविद्यालयांचा निर्णय होण बाकी आहे. तर एकूण ३५० महाविद्यालयांनी प्रस्तावासाठीचा लॉगिन आयडी तयार केला आहे. सायंकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यताही कुलगुरूंनी व्यक्त केली.
तसेच महाविद्यालयांनी अकॅडमिक आॅडिट केल्याशिवाय त्यांना विद्यापीठाची संलग्नता मिळणारच नाही. त्याविषयी कायद्यातच तरतूद आहे. काही संस्थाचालकांनी नव्याने सुरू झालेले महाविद्यालय आणि जुने महाविद्यालय, अशी वर्गवारी करण्याची विनंती केली आहे. त्यावरही विचार करण्यात येत आहे. मात्र अकॅडमिक आॅडिटमधून कोणालाही सूट मिळणार नसल्याचेही कुलगुरू डॉ. येवले यांनी स्पष्ट केले.संवैधानिक अधिकाऱ्यांच्या मुलाखतीच्या तारखा ठरल्याविद्यापीठाच्या संवैधानिक अधिकाऱ्यांच्या मुलाखतींच्या तारखा ठरल्या आहेत. चार अधिष्ठातांच्या मुलाखती ७, ८ व १४ मार्च रोजी उस्मानाबाद उपकेंद्र संचालक आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक आणि १५ मार्च रोजी कुलसचिवपदासाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. येवले यांनी सांगितले. तसेच विद्यापीठातील ४५ विभागांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमॅट्रिक हजेरी सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.संतपीठाची केव्हाही घोषणा होईलपैठण येथील संतपीठाला विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा केव्हाही केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.येवले यांनी दिली. तीन दिवसांपूर्वी उच्चशिक्षणमंत्र्यांसोबत राज्यातील कुलगुरूंची बैठक झाली. या बैठकीमध्ये मंत्र्यांनी संतपीठाविषयी विविध विद्यापीठांना अभ्यासक्रम सुचविण्याच्या सूचना केल्या आहेत. हे स्वतंत्र विद्यापीठ असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.