- राम शिनगारे
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भागांत दुष्काळ तर काही ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये सर्वाधिक वाटा हवामान विभागाचा आहे. हवामान विभाग सक्षम करण्यासाठी राज्यकर्त्यांची उदासीनता आणि अधिकाऱ्यांचा मुजोरपणाच कारणीभूत ठरत आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत बदल करण्याठी पर्जन्यरोपण (कृत्रिम पाऊस) तंत्रज्ञानाला आपली महागडे तंत्रज्ञान म्हणून बोटे मोडण्याच्या पुढे मजलच जात नाही, ही खरी खंत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली...
कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे नेमके काय आहे?मुळात कृत्रिम पाऊस पडत नसतो. त्याला पर्जन्यरोपण म्हणतात. हे तंत्रज्ञान अनेक वर्षांपासून जगभरात वापरण्यात येत आहे. त्याकडे केंद्र, राज्य सरकारांनी दुर्लक्ष केले आहे. दुष्काळासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र पर्जन्यरोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे उदासीनता आहे. राज्यकर्त्यांची बेफिकिरी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मुजोरपणा आडवा येत आहे.
पर्जन्यरोपण तंत्रज्ञान जगभरात कोठे वापरण्यात येते?उपलब्ध ढगांकडून कार्यक्षम व वापर करण्यासाठी आजमितीला ४७ राष्ट्रांमध्ये पर्जन्यरोपण तंत्रज्ञान नियमित वापरण्यात येते. चीन, रशिया, जॉर्डन, इंडोनेशिया, अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, अरब राष्ट्रे, इस्रायल, दक्षिण आफ्रिकासह इतर देशांत पाण्याच्या नियोजनासाठी पर्जन्यरोपण तंत्रज्ञान सर्रास वापरले जाते. चीनमध्ये एक लाखांपेक्षा अधिक तंत्रज्ञ व हवामानशास्त्रज्ञ यावर काम करतात.
पर्जन्यरोपण तंत्रज्ञान भारतात केव्हापासून वापरण्यात येते?भारतात आंध्र प्रदेशमध्ये २००५ पासून हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. आंध्र, कर्नाटक या राज्यांतील आतापर्यंत दीडशे कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च केले आहेत. मात्र त्यात सातत्याचा अभाव आहे. २००६ सालीच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतात पर्जन्यरोपण कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले होते. हैदराबाद येथे कार्यशाळा झाली. मात्र आपल्याकडे तंत्रज्ञान काही विकसित झाले नाही.
पर्जन्यरोपण कधी यशस्वी होते?पर्जन्यरोपण तंत्रज्ञानासाठी कमालीची दक्षता घ्यावी लागते. पर्जन्यरोपणासाठी विमान व रडार यंत्रणेएवढेच महत्त्व हाताळणी आणि व्यवस्थापनाला आहे. वाऱ्याचा वेग व दिशा, तापमान, हवेचा दाब, आर्द्रता, ढगांची व्याप्ती यांची सतत नोंद ठेवावी लागते. जगभरात ही धुरा हवामानशास्त्रज्ञांवर सोपविली जाते. आपल्याकडे हे काम पाटबंधारे, महसूल विभागाकडे दिले जाते. रेडिओ लहरींकडून रडारच्या साह्याने ढगांची सविस्तर माहिती संगणकावर येत असते. अतिशय प्रगत तंत्रज्ञानामुळे जमिनीपासून ढगाची उंची, ढगाच्या मनोऱ्याचा विस्तार तापमान, बाष्पकणांची घनता, पाण्याची उपलब्धता संगणकावर समजू शकते.
शनिवारी औरंगाबादेत पर्जन्यरोपणाचा प्रयोग करण्यात आला. मात्र अपेक्षित असणारी ढगांची उंची आणि त्यातील आर्द्रता नसल्यामुळे प्रयोग यशस्वी झाला नाही. आता पुन्हा प्रयोग करण्यासाठी २० डी.बी.झेड. ढगांची घनता आणि त्यातील आर्द्रतेचे प्रमाण याची वाटच पाहावी लागणार आहे. अतिउत्साह अथवा अतिउदासीनता ही दोन टोके न गाठता खुल्या वैज्ञानिक दृष्टीने पर्जन्यरोपणाचे प्रयोग केले पाहिजेत.
- अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ