कोरोना लसीची करुण कहानी : हेल्थ, फ्रंटलाइन वर्कर त्रस्त
मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ऑगस्टअखेर येईल, असे भाकीत वर्तविण्यात येत आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर मंडळींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच जीवित हानी कमी झाली. डेल्टा प्लस किंवा तत्सम व्हायरस येऊ शकतात. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचारी सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस मिळेना, अशी अवस्था निर्माण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना सहजासहजी लस मिळत आहे. खाजगी रुग्णालये, शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लससाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे.
हेल्थ लाइन वर्कर- ३२,०००
फ्रंटलाइन वर्कर- ४५,०००
पहिला डोस घेतलेले- २८,९९५
दुसरा डोस घेतलेले- १६,३४७
एकही डोस न घेतलेले- ५,०००
लसीकरणाबाबत काही प्रमाणात उदासीनता का?
औरंगाबाद शहरात जवळपास ३२ ते ३५ हजार हेल्थलाइन वर्कर असावेत, असा अंदाज मनपाच्या आरोग्य विभागाने वर्तविला. जवळपास ७० ते ७५ टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस अनेकांना मिळत नाही. उर्वरित काही कर्मचारी अजूनही पहिला लस घेण्यास तयार नाहीत. अशा कर्मचाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. लसबाबत काही नागरिकांमध्ये गैरसमज आहेत. जनजागृतीद्वारे त्यांचे गैरसमज दूर करण्यात येत आहेत. लवकरच हे प्रमाणही शंभर टक्के होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
........................
त्यांनाही लस देऊ
लसीकरण हा ऐच्छिक विषय आहे. महापालिकेतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली आहे. मोजकेच काही कर्मचारी शिल्लक असतील. लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांनाही लस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याबाबतही विचार सुरू आहे. शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात साठा उपलब्ध होत आहे.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा