कन्नड - तालुक्यातील जामडी घाटग्राम पंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि दोन ग्रामपंचायत सदस्य कोरोना पॉझिटीव आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे चौघेही गुरुवारी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सहभागी असल्याने चिंता वाढली आहे.
येथे उपसरपंच पदाची निवडणुक गुरुवारी झाली. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी यांनी मंगळवारी ( दि. २ ) वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली. मात्र याचा अहवाल त्यांना लागलीच मिळाला नाही. यामुळे सर्वजण गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सहभागी झाले. सभेस लोकनियुक्त सरपंच, पाच सदस्य, ग्रामसेवक, तलाठी आदींची उपस्थिती होती.
दरम्यान , सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. यात निवडणूक प्रक्रियेत सहभागी ग्रामसेवक, सरपंच व दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.