पैठण : सिटी सर्व्हेला जागेची नोंद करण्यासाठी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक जयदीप मधुकर शितोळे ( ३० ) यास १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. भुमीअभिलेख कार्यालयात सोमवारी ( दि. १५ ) ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहितीअशी की, तक्रारदार यांनी तक्रार दिली होती की , त्यांच्या वडीलांचे नावे असलेले बिडकीन ता पैठण जि औरंगाबाद येथील सिटी सहें नं १२५९ मधील वाटणी पत्राव्दारे वाटयाला आलेली जागा १२९.५ चौ.मी क्षेत्रफळाची नोंद सिटी सर्व्हेला करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता . सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी तालुका भुमी अभिलेख , पैठण यांच्याकडे पाठवल्याने त्यांनी उपअधिक्षक, तालुका भुमी अभिलेख, पैठण यांच्याकडे जावून त्यांच्या वाटयाच्या क्षेत्रफळाची नोंद करणे बाबत विचारणा केली. यावेळी तेथील उपअधिक्षक जयदीप एम . शितोळे यांनी, तुमच्या क्षेत्रफळाची नोंद करायची असेल तर २० हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. पथकाने पडताळणी करून सोमवारी भुमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. यावेळी उपअधिक्षक जयदिप मधुकर शितोळे यास तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ . राहुल खाडे , अपर पोलीस अधिक्षक डॉ . अनिता जमादार , यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधिक्षक रविंद्र डी. निकाळजे, कर्मचारी ज्ञानदेव मुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, ज्ञानेश्वर म्हस्के, गजानन घायवट, जावेद शेख , शिवाजी जमधडे , गणेश चेके, सचिन राऊत, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, गजानन कांबळे व चालक प्रविण खंदारे, आरेफ शेख यांनी केली.