लातूर : स्थायी समितीच्या सभापतीपदी बाळासाहेब उर्फ पप्पू देशमुख यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही निवड जाहीर केली. महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अख्तर शेख यांची महापौरपदी निवड झाल्याने स्थायी समितीचे सभापतीपद रिक्त होते. बुधवारी पीठासन अधिकारी पांडुरंग पोले यांनी सकाळी ११ वाजता सभा बोलाविली होती. मनपाच्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. त्यात ११ काँग्रेस, ३ राष्ट्रवादीचे, शिवसेना व रिपाइंचा प्रत्येकी १ सदस्य आहे. संख्याबळ काँग्रेसचे अधिक असल्याने काँग्रेसचे बाळासाहेब उर्फ पप्पू देशमुख यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर झाली. सकाळी ९ पासून १० वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले होते. ११ वाजता अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर अर्ज मागे घेण्यास १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. परंतु, पप्पू देशमुख यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी नूतन सभापती पप्पू देशमुख यांचे महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, अॅड. समद पटेल, नरेंद्र अग्रवाल, केशरबाई महापुरे, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, नवनाथ आल्टे, रवि सुडे यांनी स्वागत केले. यापूर्वी अख्तर शेख, अॅड. समद पटेल, राम कोंबडे यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले आहे. समितीकडे आर्थिक व्यवहाराचे नियोजन व नियंत्रण असल्याने या पदाला महत्व आहे. काँग्रेसचे बहुमत असल्याने पक्षश्रेष्ठी सांगतील त्याला पद मिळेल, अशी प्रथा आहे. त्यानुसार बाळासाहेब उर्फ पप्पू देशमुख यांना सभापतीपद मिळाले. (प्रतिनिधी)
‘स्थायी’च्या सभापतीपदी देशमुख
By admin | Published: January 01, 2015 12:17 AM