छत्रपती संभाजीनगर : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत धरणांतील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन टाकण्यासाठी शासनाकडून एनजीओंची मदत घेतली आहे. जलसंधारण विभाग आणि जि. प.चा लघु पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ६१ तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामावर सुमारे ७ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जलसंधारण विभागाने जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे १७०० पाझर तलाव, साठवण तलाव बांधलेले आहेत. आता जिल्ह्यात नवीन तलाव बांधण्यासाठी साइट उपलब्ध नाही. जुन्या तलावांना ४० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. सर्वाधिक पाझर तलाव हे ८० च्या दशकात झालेले आहेत. या तलावांत आता मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. परिणामी, या तलावांची पाणी साठवण क्षमता घटल्याचे दिसून येते. यामुळे या तलावांत संकल्पित जलसाठा होत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना आणली.
या योजनेंतर्गत धरणांतील गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, या धरणांतील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पसरावा, यासाठी शासनाकडून अनुदानही देण्यात येते. शिवाय शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही दिला जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसंधारण अधिकाऱ्यांनी ५३ तलावांतील गाळ काढण्यास मंजुरी दिली. या धरणांत ६,२२,१८१ घनमीटर गाळ आहे. यापैकी आतापर्यंत ३,२६,८५९ घनमीटर गाळ उचलण्यात आला असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी कोठवळे यांनी सांगितले. चार एनजीओंची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी ६ कोटी २ लाख २२ हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदही काढणार धरणांतील गाळजिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील ८ धरणांतील गाळ काढण्यास मान्यता मिळाली आहे. यात खुलताबाद तालुक्यातील चार तर कन्नड, फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एक आणि वैजापूर तालुक्यातील दोन धरणांचा समावेश आहे. या कामावर १ कोटी १० लाख १३ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
तालुक्याचे नाव --- धरणांची संख्या ---- साचलेला गाळ (घनमीटरमध्ये)छत्रपती संभाजीनगर --- १० ---- १६४६२५कन्नड --- १२ ---- ८९९०५खुलताबाद --- १० ---- ९६९७१फुलंब्री --- ०६ ---- ९५६७०सिल्लोड --- ४ ---- ४०२७१पैठण --- ५ --- ९९०३५वैजापूर -- ६ --- ३५७०४