छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाच्या आस्थापनेवरील तलाठी पदावर लोकसभा निवडणुकीपूर्वी निवड होऊनही सुमारे ८७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिलेली नाही. स्वातंत्र्यदिनी पाच उमेदवारांना नियुक्ती दिली. मात्र, उर्वरित सर्व तलाठ्यांना प्रशासनाने ताटकळत ठेवले आहे. नियुक्तीबाबत असलेले कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत. इतर सर्व जिल्ह्यांत नियुक्ती झाली. काही जिल्ह्यांत तर प्रतीक्षा यादी लागली आहे. संभाजीनगरात कायदेशीर अडथळा नसतानाही नियुक्ती दिलेली नाही. सर्वांचे कागदपत्र पडताळणी झालेली असतांना नियुक्ती मिळत नसल्याने पात्र उमदेवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
फक्त पाच नियुक्ता दिल्यासंभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ ऑगस्ट रोजी गणेश नारायणकर, रूपाली गवळी, पल्लवी राऊत, सुरेश मस्के, सुधाकर कासार या पाच उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. सुमारे ८७ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मागील काही महिन्यांपासून ते खेटे मारत आहेत. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
उमेदवारांमध्ये रोषआधी परीक्षा द्यायच्या, त्यात उत्तीर्ण व्हायचं आणि त्यानंतर नियुक्तीसाठी प्रशासनाकडे हेलपाटे मारायचे, आंदोलन आणि उपोषण करायचे, अशी परिस्थिती उमेदवारांवर आली आहे. येत्या महिनाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे नियुक्ती पुन्हा रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उमेदवार काय म्हणतात
निवड होऊन सहा महिने झाले, तरीही प्रशासन नियुक्तीपत्र देत नाही. वरिष्ठ अधिकारी आम्हाला भेटत नाहीत.- उमेदवार
पाच जणांनाच का नियुक्ती दिली, बाकीच्या उमेदवारांना नियुक्ती का दिली नाही. यावर जिल्हा प्रशासनातील अधिकारी बोलत नाहीत.- उमेदवार