औरंगाबाद : निधीअभावी विकासकामे होत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची नेहमी असते. मात्र, जिल्हा परिषदेत निधी उपलब्ध असूनही एकूण मंजूर कामांपैकी निम्म्यापेक्षा अधिक विकासकामे रखडल्याची धक्कादायक माहिती आर्थिक आणि भौतिक प्रगती अहवालातून उघडकीस आली आहे. ग्रामीण भागात एकूण १३१३ विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ ६१७ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
यावर्षी कोरोनामुळे सुरुवातीला निधी खर्चाच्या मान्यतेअभावी नियोजन रखडले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या हेव्यादाव्यात नियोजन रेंगाळत गेले. परिणामी तीन कोटी ३१ लाखांचा निधी अखर्चित राहिला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सर्व प्रशासकीय मान्यता झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात ३३६ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. जुन्या आणि नव्या कामांतील ६१७ कामे मार्चपूर्वी पूर्ण झाली असून, ३३७ कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जफर अहेमद काझी यांनी दिली.
---
सुविधांची ३३७ कामे रेंगाळली
ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणाची १४९ कामे, क वर्ग तीर्थक्षेत्र विकासाची ४५ कामे ब वर्ग तीर्थक्षेत्र विकासाची तीन, लोकप्रतिनिधींनी सुचविलेली ११७, तर प्राथमिक आरोग्य व उपआरोग्य केंद्रांची २३ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. नागरिकांना सुविधा निर्माण करणाऱ्या या कामांना गती देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांतून होत आहे.
---
जिल्हा परिषदेच्या योजनांचा आर्थिक प्रगती अहवाल
योजना - एकूण उपलब्ध निधी - मार्चअखेर खर्च झालेला निधी - शिल्लक निधी - पूर्ण कामांची टक्केवारी
ग्रा. रस्ते विकास व मजबुतीकरण (३०५४) - १८.४४ कोटी -१७.०६ कोटी -१ कोटी ३७ लाख ४४ हजार रु.-५६ टक्के
ग्रा. रस्ते विकास व मजबुतीकरण (५०५४)- २३.३९ कोटी -२३.३९ कोटी- ००-४२ टक्के
क -वर्ग तीर्थश्रेत्र विकास - २.९७ कोटी - २.९७ कोटी - ००-४६ टक्के
लोकप्रतिनिधींनी सुचविललेली कामे (२५१५)- ९ कोटी ३० लाख ४७ हजार रु.- ८ कोटी ७८ लाख ७८ हजार रु.- ५१.५९ लाख - ४७ टक्के
प्रा. आ. केंद्र व उपकेंद्र बांधकाम - ६ कोटी २० लाख - ५ कोटी २७ लाख ६ हजार रु. - ९२ लाख ४० हजार रु.- ३८ टक्के
---
बांधकामाची सद्य:स्थिती
१०२४ - ३१ मार्च २०२० पूर्वीची अपूर्ण कामे
२८९ - २०२०-२१ मधील मंजूर कामे
१३१३ - एकूण मंजूर कामे
६१७ - कामे पूर्ण
३५९ - कामे प्रगतिपथावर
३३७ - सुरू न झालेली कामे