औरंगाबाद : शहरामध्ये जुन्या निकामी झालेल्या आणि वापरात नसलेल्या सोनोग्राफी मशीनची लवकरच विल्हेवाट लागणार आहे. निरुपयोगी मशीन नष्ट करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
जुन्या यंत्राची विल्हेवाट लावण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने सोनोग्राफी केंद्रचालक, रेडिओलॉजिस्ट संघटना, महापालिका, जिल्हा रुग्णालयांकडून आरोग्य विभागाकडे चौकशी केली जात होती. अखेर सोनोग्राफी यंत्रांची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित क्षेत्रातील जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने निर्णय घ्यावा, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे सोनोग्राफी यंत्रे सांभाळण्याच्या कटकटीपासून सोनोग्राफी केंद्रांची सुटका होणार आहे.
शहरात किमान १० जुनी, वापरात नसलेली सोनोग्राफी यंत्रे असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. जी यंत्रे निरुपयोगी आहेत, ती पुन्हा वापरात आणता येणार नाहीत, अशी यंत्रे नष्ट करण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीचा राहणार आहे. त्यासाठी यंत्र समितीकडे घेऊन येण्यासाठी जिल्हा समुचित प्राधिकारी यंत्रधारकास परवानगी देतील. त्यासाठी यंत्राचा मेक, मॉडेल आदी माहिती द्यावी लागेल. यंत्र नष्ट करताना ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करावे लागेल. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचे आदेशही आरोग्य विभागाने दिले आहेत.
का स्थापन केली समिती ?‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात जुन्या निकामी आणि वापरात नसलेल्या सोनोग्राफी यंत्रांची विल्हेवाट कशी लावावी, यासंदर्भात तरतूद नाही. त्यातून नादुरुस्त यंत्रे वर्षानुवर्षे सांभाळण्याची वेळ अनेकांवर येत आहे. नवीन यंत्रे घेतली तरी जुन्या यंत्रांची नोंद ठेवावी लागत होती. त्यामुळे नादुरुस्त सोनोग्राफी यंत्रांची विल्हेवाट कशी लावावी, यासंदर्भात संभ्रम निर्माण झालेला होता.
काय होता धोका?सोनोग्राफी यंत्र बंद असल्याचे तसेच वापरात नसल्याचे दाखवून, त्या यंत्राचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे यापुढे जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून यंत्रे नष्ट होतील. त्यामुळे संभाव्य गैरप्रकारांनाही आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चांगला निर्णय
सोनोग्राफी यंत्राच्या विल्हेवाटीसाठी आतापर्यंत कोणती नियमावलीच नव्हती. नवीन यंत्र घेतल्यानंतर जुने पडून राहत असे. यंत्र आहे म्हटले की, त्याची नोंद ठेवावी लागत होती. जिल्हास्तरीय समितीमार्फत नादुरुस्त यंत्रे नष्ट करण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला. त्यातून आता नादुरुस्त यंत्रे नष्ट करता येतील. शहारात किमान दहा यंत्रे आहेत.- डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, राज्य सचिव, रेडिओलॉजिस्ट असोसिएशन