औरंगाबाद : जीवन गुणवत्तेत औरंगाबाद शहर देशात १३व्या स्थानी आले आहे. पुढच्या वर्षी शहराला टॉप टेनमध्ये आणण्याचा निर्धार पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या परिश्रमामुळे हे साध्य झाले. शहरातील नागरिकांचे जीवनमान अधिक आनंदी कसे बनेल, यादृष्टीने भविष्यात काम करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी शुक्रवारी दिले.
शहराने इज ऑफ लिव्हिंग (ईएलओ)मध्ये ३४वा क्रमांक पटकावला असून, जीवन गुणवत्ता सुधारणेत १३वे स्थान मिळवले आहे. या चांगल्या कामगिरीबद्दलची माहिती देण्यासाठी देसाई यांनी पाण्डेय यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. शहराने ६३व्या स्थानावरून झेप घेत ३४वे स्थान पटकावले आहे. शहराची ही चांगली प्रगती आहे. शिक्षण, आरोग्य आणि विकासकामामध्ये नजरेत भरणारी ही प्रगती ठरली आहे, असे देसाई म्हणाले. या शहराबद्दल मुख्यमंत्र्यांचा ममत्व भाव, आपुलकीची भावना यामुळेच शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. पाणी, कचरा, रस्ते हे मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील मान्यवरांच्या भेटी घेत विकासाचा संवाद हा कार्यक्रम घेतला. आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सूचना विचारात घेऊन शहराच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्याचे काम हाती घेतले.
महापालिकेच्या मेहनतीचे फळ
अखिल भारतीय पातळीवर महापालिकेच्या सेवांचा विचार मानांकन देताना करण्यात आला. आरोग्य, शिक्षण व इतर सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळाले तसेच मनपा प्रशासनाने प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्री देसाई यांनी मनपा प्रशासक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले.
केंद्राच्या निकषांचा अभ्यास करून त्रुटी दूर करणार
केंद्र शासनाने औरंगाबाद शहराला दिलेल्या वेगवेगळ्या रँकिंगमध्ये कोणकोणते निकष तपासण्यात आले. याचा बारीक अभ्यास करून त्रुटी दूर करण्यात येतील. केंद्राच्या सर्वेक्षणात नागरिक हा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या समाधानावर बरेच काही अवलंबून आहे. पुढील वर्षी शहराला टॉप टेनमध्ये आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.