देवगावरंगारी : देवगावरंगारी येथील भूमिपुत्र ऋषिकेश अशोक बोचरे हे लेह-लडाखमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. या जवानाला गुरुवारी (दि.१४) रात्री ८ वाजेच्या सुमारास मार्केट कमिटी परिसरात शासकीय इतमामात हजारो उपस्थितांनी साश्रुनयनांनी निरोप दिला. यावेळी ‘ऋषिकेश बोचरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
भारतीय सेना सेवेत युनिट ११९ असॉल्ट इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेला हा वीर जवान ७ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाला होता. जम्मू-काश्मीरमधील लेह-लडाख येथे कार्यरत असताना मंगळवारी सकाळी हिमस्खलन होऊन त्याखाली दबून वीर जवान शहीद झाला होता. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान विशेष विमानाने या जवानाचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. येथे लष्करी अधिकारी, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, पोलीस अधिकारी यांच्यासह मान्यवरांनी मानवंदना दिल्यानंतर जवळपास रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास देवगावरंगारी येथे पार्थिव पोहोचले. याप्रसंगी ‘ऋषिकेश बोचरे अमर रहे’च्या घोषणांनी अवघे गाव दणाणून गेले होते. यावेळी गावकऱ्यांनी गावात मोठमोठे बॅनर लावून आपल्या लाडक्या जवानाप्रती भावना व्यक्त केल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारोंच्या संख्येने उभ्या असलेल्या नागरिकांनी पाणवलेल्या डोळ्यांनी सलामी दिली. जवानाच्या राहत्या घरासमोर पार्थिव येताच पत्नी प्रियांका बोचरेसह, आई, वडील, आजी, भाऊ, बहीण, आप्तस्वकीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. घरापासून फुलांनी सजवलेल्या वाहनात जवानाच्या अंत्ययात्रेला सुरुवात होताच ‘ऋषिकेश बोचरे अमर रहे’च्या घोषणा देत, तसेच पुष्पवर्षाव करून हजारो उपस्थितांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पुतण्या सोनू बोचरे याने दिला जवानाच्या पार्थिवाला अग्निडाग मार्केट कमिटीत उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याजवळ लष्करी अधिकाऱ्यांनी तीन फैरी झाडून वीर जवानाला मानवंदना दिली. त्यानंतर लष्करातील अधिकाऱ्यांनी जवानाच्या पत्नीकडे फ्लॅग सोपविला. उपस्थित लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. ४त्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी पुतण्या सोनू रावसाहेब बोचरे याने जवानाच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देत अनंतात विलीन झालेल्या जवानाचा निरोप घेतला. या जवानाच्या पश्चात पत्नी, आजी, आई, वडील, भाऊ, बहीण व भावजय, असा परिवार आहे............