औरंगाबाद : थकित कर्जांमुळे फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्याचा अंतरिम निर्णय प्रादेशिक सहसंचालकांनी घेतला आहे. विशेष लेखापरीक्षक आर. एस. शेख यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी कारखाना अवसायनात काढण्याचा निर्णय ३ आॅगस्ट रोजी घेतला. अवसायक नेमण्याच्या अंतरिम आदेशाबाबत ७ सप्टेंबर रोजी सुनावणी झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. देवगिरी साखर कारखान्याचे गाळप २०११-१२ पासून बंद आहे. कारखान्याकडे ४६ कोटी ५० लाखांची कर्जे थकली आहेत. कारखान्याची यंत्रसामग्री, मालमत्ता, इमारत अग्रणी बँकेने जप्त केली आहे. आर्थिकदृष्ट्या कारखाना डबघाईस आला असून, २००२-०३ पासून कारखान्याने लेखा परीक्षण दोष दुरुस्ती अहवाल सादर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर कारखाना अंतरिम अवसायानात काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सहनिबंधक (सहकारी संस्था) तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे. कारखान्याच्या अवसायकपदी विशेष लेखापरीक्षक (वर्ग-१) आर .एस. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, देवगिरी साखर कारखान्याची रविवारी सर्वसाधारण सभा होणार असून, या निर्णयाचे पडसाद सभेत उमटण्याची चिन्हे आहेत.
देवगिरी कारखाना अवसायनात
By admin | Published: September 24, 2016 12:14 AM