औरंगाबाद : जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचा (कडा) ‘वॉच’ राहणार आहे. जायकवाडीत ज्या- ज्या धरणांतून पाणी सोडले जाणार आहे, तेथे सोडण्यात येणाऱ्या पाण्याची नोंद ठेवण्यासाठी पथक पाठविण्यासाठी संनियंत्रण यंत्रणेने तयारी केली आहे.
कडा भवन येथे बुधवारी अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी पैठण येथील कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जायकवाडीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणातून ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वरच्या धरणांतून पाणी सुटल्यानंतर कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. मुळा, प्रवरा, गोदावरी दारणा, पालखेड या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश आहेत. पाणी विसर्ग सुरू झाल्यानंतर या समूहातील प्रत्येक धरणावर चार जणांचे पथक देखरेख करण्याचे काम करील.
नदीकाठच्या गावांची यादीपाणी सोडण्याचे आदेश आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क करण्याचे काम केले जात आहे. त्यादृष्टीने गावांची यादी घेण्यात येत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने यंत्रणेची तयारी पूर्ण केली आहे.