लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केंद्र शासनाच्या अमृत अभियानातंर्गत नांदेड महापालिकेच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली असून यासाठी दोन कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. हरित क्षेत्र विकास प्रकल्पातंर्गत शहरातील उद्यानांचा विकास केला जाणार आहे.महापालिकेने अमृत अभियानातंर्गत २०१७-१८ मध्ये हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचा अहवाल मंजूर करुन केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला होता. राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने महापालिकेच्या या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाच्या विकास आराखड्यांना मान्यता देऊन राज्य शासनाने शिफारशीद्वारे केंद्र शासनाकडे पाठविला होता. केंद्र शासनाच्या अमृत अभियानातंर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात केंद्र शासनाने नांदेड महापालिकेच्या दोन कोटीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. यामध्ये केंद्र शासनाकडून १ कोटी रुपये, राज्य शासनाचे ५० लाख आणि महापालिकेचा स्वत:चा ५० लाखांचा वाटा राहणार आहे. केंद्र शासनाकडून हा निधी तीन टप्प्यात दिला जाणार आहे. राज्य शासनाचा वाटा प्राप्त झाल्यानंतर हा निधी महापालिकेला उपलब्ध होईल. सदर प्रकल्पासाठी वितरित केलेला निधी हा त्याच प्रकल्पासाठी वापरणे बंधनकारक असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. इतर कामांसाठी हा निधी वापरल्यास गंभीर वित्तीय अनियमितता समजण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.हरित क्षेत्र विकास प्रकल्पातंर्गत शहरात काबरानगर, गणेशनगर (विस्तारित), विनायकनगर, नवामोंढा भागातील टाऊन मार्के, सिडकोतील वात्सल्य को-आॅप. सोसायटी आदी भागात उद्यान विकसित केले जाणार आहेत. तसेच शहरात वृक्षलागवडही केली जाणार आहे.सदर प्रकल्पातंर्गत समाविष्ट झाडांची लागवड करताना त्यांची संख्या महापालिका आयुक्तांना प्रमाणित करावी लागणार आहे. त्यापैकी ८० टक्के झाडे जगतील याची खबरदारीही घ्यावी लागणार आहे.
अमृत अभियानातंर्गत शहरातील उद्यानांचा होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:36 AM