वैजापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकाजवळ आल्यामुळे सत्तेच्या कार्यकाळात विकास प्रकल्प उभारण्याचे वेध सभापतीसह सदस्यांना लागले आहेत. यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मोक्याच्या भूखंडावर विकास प्रकल्प साकारण्यासाठी पं. स. सभापती सिना मिसाळ यांनी कंबर कसली आहे. ३ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची या विषयावर तातडीने विशेष सभा घेण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
शहरात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मालकी हक्क असलेल्या येवला रोड, लाडगाव रस्ता, पोलीस स्टेशनरोड या परिसरात मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये मूल्यांकन असलेल्या मालमत्ता वापरविना पडल्या आहेत, तर काही ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. अशा मालमत्ता ताब्यात घेऊन त्या विकसित करण्याची भूमिका दोन वर्षांपूर्वीच पंचायत समितीतील सर्व पक्षीय सदस्यांनी घेतली होती. त्या अनुषंगाने शहरातील मालमत्तेची संयुक्त पाहणीही करण्यात आली होती. कोरोनामुळे हा प्रश्न रेंगाळत पडलेला होता. या विषयावर पं. स. सभापती सिना मिसाळ यांनी गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे, जि. प. बांधकाम उपविभागाचे अभियंता कल्याण हत्ते यांच्यासोबत याविषयी चर्चा केली. पं. स.च्या अधिकारी निवासस्थानातील अतिक्रमण हटविण्यासाठी काय कारवाई केली, विकास प्रकल्प साकारण्यासाठी वास्तूविशारद यांची नियुक्ती केली का? अशा प्रश्नांचा त्यांनी भडीमार केला. मात्र, अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने त्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा व ठोस धोरण निश्चित करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी पं. स. सभागृहात सदस्यांसह अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
कोट
अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे
वैजापूर पं. स. समितीतील सत्ताधारी व विरोधी गटातील सदस्यांनी शहरातील तीन ठिकाणी पं. स.ची मालकी असलेल्या मालमत्ता विकसित करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेतला होता. कोविडमुळे या विषयाचा पाठपुरावा वर्षभरापासून थांबलेला होता. आता पुन्हा या विषयावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन मालमत्तेचा विकास कशा पद्धतीने करायचा, निधीची तरतूद, विकास आराखडा या सर्व मुद्द्यांवर सर्वांच्या संमतीने बैठकीत निर्णय घेऊ.
-सिना मिसाळ, सभापती, पंचायत समिती, वैजापूर
फोटो :
020921\img_20210902_144956.jpg
फोटो