औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दिलेल्या १०० कोटींतील निधीतून मनपाने मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त आठ किलोमीटर कामे पूर्ण केली. कासवगतीने सुरू असलेल्या कामांबद्दल आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी आश्चर्य व्यक्त केले. १५ जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व कामकाज मी ताब्यात घेईन, असा इशाराही त्यांनी दिला.
जानेवारीत कंत्राटदारांना वर्कआॅर्डर देण्यात आली. दोन महिने उशिराने कामे सुरू झाली. ड्रेनेज, पाईपलाईन शिफ्ट करणे, पोल, रोहित्र हटविणे, अशा कामांमुळे विलंब झाल्याचे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी तुम्हाला १५ जानेवारीपर्यंत वेळ देतो, नंतर मी सर्व ताब्यात घेईन, अशी तंबी आयुक्तांनी दिली. समांतर जलवाहिनी योजना, एलईटी प्रकल्पाची माहिती सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. एलईडी प्रकल्पासाठी किती पैसा जातो? अशी विचारणादेखील त्यांनी केली.
शहराच्या पाणीपुरवठ्याचा आढावादेखील आयुक्तांनी घेतला. शासनाने मंजूर केलेल्या १६८० कोटी रुपयांची योजना कोणत्या स्तरावर आहे. शहरात किती बेकायदा नळ आहेत, याची माहिती अधिकाऱ्यांना आयुक्तांनी विचारली. त्यावर अधिकाऱ्यांना बेकायदा नळांची माहिती सांगता आली नाही. प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र करण्याची सूचना आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना केली. सरकारी कार्यालयात महापालिकेचा एक कर्मचारी नियुक्त करण्याचे आयुक्तांनी नमूद केले.