छत्रपती संभाजीनगर/मुंबई - सरकारी मदतीचे पंख राजपूत समजाला लावले जातील. राजपूत समाजाच्या पुढील भामटा हा शब्द काढून टाकला पाहिजे आणि सरकार हे मान्य करुन भामटा हा शब्द काढत आहे, आता त्यासाठी लागेल ते केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलताना राजपूत समाजाला दिले. तत्पूर्वी भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजपूत हा लढवय्या आणि क्षत्रीय समाज असल्याचं सांगितलं. या समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लावणे योग्य नाही. समाजाला भामटा म्हणणे हीच भामटेगिरी असल्याचंही ते म्हणाले.
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन केले जाईल. तसेच महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून, अनावरणासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना बोलविले जाईल. पहिले सरकार कोमात होते, मात्र, आपल्या सरकारची कामे जोमात सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले, मेहनती व धाडसी समाजामागे भामटा हा शब्द राहणार नाही, यासाठी केंद्र शासनाकडेदेखील पाठपुरावा केला जाईल.
रेल्वे स्टेशन रोडवरील अयोध्यानगरी येथे झालेल्या या संमेलनाप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती.
१५ दिवसांत बैठक
सकल राजपूत समाजाच्या मागण्यांसाठी केली. येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह संमेलनात जाहीर केले. ते म्हणाले, देशाच्या इतिहासात क्षत्रिय समाजाचे योगदान कुणीही विसरू शकणार नाही. स्वातंत्र्यानंतर समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. समाजासमोर लागलेला भामटा हा शब्द बदलायला हवा. कुठल्याही राजपुताच्या पुढे भामटा हा शब्द लागणार नाही, यासाठी पाठपुरावा केला जाईल. लढवय्या समाजापुढे भामटा शब्द लावणे योग्य नाही. तर, समाजाला भामटा म्हणणे हीच मोठी भामटेगिरी आहे, असे म्हणत आपण भामटा शब्द काढण्याचा निर्धार केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटलं.